कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दोन गटांत राडा | महिलेसह १३ जणांविरोधात गुन्हा दाखल

कणकवली( प्रतिनिधी) : कटर ब्लेडने वार झाल्यानंतर जखमी युवकाला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल  केल्याची घटना समजताच गुन्ह्याची माहिती घेण्यासाठी रुग्णालयात गेलेल्या पोलिस अधिकारी आणि अंमलदारांनाच धमकी आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी श्वेता संदीप परब या महिलेसह अन्य १३ जणांविरोधात कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सचिन माने यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना ३ मे रोजी रात्री पावणे बारा ते ४ मे रोजी मध्यरात्री पावणे एक च्या सुमारास घडली. भावेश रजपूत याच्यावर कटर ब्लेडने वार केल्याची घटना समजताच कणकवली पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यावेळी सुमारे ६० ते ७० जणांचा जमाव उपजिल्हा रुग्णालय आवारात जमला होता. आरोपींना आपल्या ताब्यात देण्याची मागणी करत हा जमाव उग्र झाला होता. त्यावेळी उपस्थित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र पोलिसांच्या आवाहनाला न जुमानता आरोपींनी पोलिसांच्या कामात अटकाव करत पोलिसांच्या अंगावर धावून जात बाहेर पड तुला दाखवतो अशी ऑन ड्युटी  पोलिसांना धमकी दिली. कॉन्स्टेबल सचिन माने यांच्या फिर्यादीवरून आरोपी श्वेता परब, नमिता गावडे, हिमांशु संदीप परब, आर्यन सावंत, साहिल सावंत, वैभव मालंडकर, रोहित जाधव, मिनार रजपूत, सूरज राणे, विनीत रजपूत, यश पाटील, मयुर धुमाळे, नवराज झेमने, प्रणय शिर्के, लवू कलकुटकी यांसह १३ जणांवर बी एन एस १९४(२), १९४,१८९,३५१(२),१३१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!