राष्ट्र सेवा दल मार्फत शिमग्यानिमित्त पर्यावरण जागृतीसाठी पथनाट्य

मोरगाव व आडाळी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राष्ट्र सेवा दलाच्या पुढाकाराने शिमग्यानिमित्त दोडामार्ग तालुक्यातील मोरगाव आणि आडाळी येथे पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी सादर केलेल्या ‘निसर्गदेवाक शबय’ या आगळ्यावेगळ्या पथनाट्याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला.

राष्ट्र सेवा दल, अनुभव शिक्षा केंद्र, रानमाणूस फाउंडेशन यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या उपक्रमाला ‘घुंगुरकाठी‘ संस्थेचे सहकार्य मिळाले. मोरगाव बौद्धवाडी येथील समाज मंदिरात आणि आडाळी नवरात्र मंडप येथे हे पथनाट्य सादर करण्यात आले. पर्यावरण जनजागृतीविषयक या उपक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्याला दाद देण्यात आली.

वेगाने होत असलेले नागरीकरण, पायाभूत सुविधांच्या नावावर होणारा पर्यावरणाचा ऱ्हास, नद्यांकडे झालेले दुर्लक्ष, शक्तीपीठ महामार्गासारखे अनावश्यक आणि घातक प्रकल्प, धनदांडगे आणि राजकारणी यांच्याकडून ओरबाडल्या जाणाऱ्या जमिनी अशा अनेक गंभीर समस्यांवर कोरडे ओढणाऱ्या या परिणामकारक पथनाट्याचे लेखन पत्रकार व अभिनेता श्रेयश शिंदे याने केले आहे. शिंगोबा (डोंगर), निळी माय (नदी), वसुंधरा (पृथ्वी), शंखासूर, सरपंच, राक्षस, शेतकरी, व्यापारी अशा विविध भूमिकांचा या पथनाट्यात समावेश होता. नद्यांचे रक्षण करा, जमिनी विकू नका, झाडे राखा, प्लास्टिकचा वापर टाळा असा संदेश देणाऱ्या या प्रहसनात्मक पथनाट्याचे दोन्ही प्रयोग बहारदार झाले.

कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सेवा दलाचे ॲड. प्रवीण नाईक, रानमाणूस फाउंडेशन, ‘घुंगुरकाठी’चे अध्यक्ष सतीश लळीत, सचिव डॉ. सई लळीत, आडाळीचे सरपंच पराग गावकर, समता कला क्रीडा मंडळाचे बाळकृष्ण कदम, अमोल कदम यांचे सहकार्य मिळाले.

सहदेव पाटकर, श्रेयश शिंदे, अमोल तांबे, युगांत चव्हाण, सत्यवान गावकर, शशांक कांबळे, संदीप सडेकर, दुर्वांक मेस्त्री, तन्मय पंडित या कलाकारांनी हे पथनाट्य सादर केले. दुर्वाँक मेस्त्री याच्या घुमट वादनाने सर्वांची मने जिंकली.

error: Content is protected !!