पालकमंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून नगरसेविका मेघा गांगण यांचा पुढाकार
कणकवली (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री नितेश राणे यांनी महिला आणि मुली यांच्यासाठी केरळा स्टोरी टू या चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण करण्याचे ठरवले होते. त्यानुसार नगरसेविका मेघा गांगण यांनी पुढाकार घेऊन कणकवली शहरातील 200 महिला व मुली यांना आज लक्ष्मी चित्रमंदिर येथे केरळा स्टोरी 2 हा चित्रपट मोफत दाखवला.
आजचे जग हे मोबाईल आणि सोशल मीडियाचे आहे आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून कानाकोपऱ्यातील मुला मुलींचा एकमेकाशी संपर्क होऊ शकतो. त्या मुलांना एकमेकांबद्दल काही माहीत नसते. मुलींना वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवून आपल्या जाळ्यात ओढलं जाते. त्यामुळे पुढे जाऊन मुलींवर फसवणुकीची वेळ येते. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आपण पेपरमधून दररोज वाचत असतो. कधीतरी अशा घटना आपल्या बाबतीत घडू शकतात आणि म्हणूनच आपल्या जिल्ह्यातील महिला व मुली सुरक्षित राहावे या एकाच विचाराने पालकमंत्री नितेश राणे यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून घराघरांमध्ये सावधानतेचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
महिला वर्गाने देखील घटनांचे गांभीर्य ओळखत केरळा स्टोरी 2 सिनेमा पाहण्यासाठी लक्ष्मी चित्रमंदिर कणकवली येथे मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहर मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, नगरसेविका प्रतिक्षा सावंत, आर्या राणे, लक्ष्मी चित्रमंदिरचे व्यवस्थापक राजू मल्हार इत्यादी उपस्थित होते.











