कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : कोल्हापूर – पोलीस मुख्यालयात नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांची मासिक गुन्हे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
सुरुवातीला पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांची ओळख करून घेतली. त्यानंतर यांनी कोल्हापूर इचलकरंजी शहर तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याकडुन वाहतुकीचा आढावा घेतला. जिल्ह्यात वाहतूक यंत्रणेत सुसूत्रता आणून शिस्त लावण्यासाठी तातडीने पुढाकार घ्यावा, असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. पासपोर्ट तसेच चारित्र्य पडताळणीबाबत नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची दक्षता प्रभारी अधिकाऱ्यांनी घ्यावी असं सांगून महिलाविषयक गुन्ह्यांचा निपटारा तातडीने झालाच पाहिजे, असा सक्त आदेश पोलिस अधिक्षक गुप्ता यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना दिला.
जिल्ह्यातील प्रलंबित गुन्हयांचा आढावा घेऊन ते तात्काळ निर्गत करण्याचे आदेश त्यांनी दिलेत निर्भया पथकं सक्षम करण्यांवर प्रभारी अधिकाऱ्यांनी प्राधान्य दयावं, खासगी क्लासेस, शाळा, महाविदयालये, रेल्वे स्थानक, बाजारपेठांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी, जिल्ह्यातील अमली पदार्थ तस्करी, बेकायदेशीर दारू विक्री, जुगार याला पायबंद घालण्यासाठी कठोर कारवाया करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपाधीक्षक अजित टिके, सुजित कुमार क्षीरसागर, आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी उपस्थित होते.












