गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांसह विमानातील 242 जणांच्या मृत्यूची भीती
न्यूज ब्युराे (अहमदाबाद) : अहमदाबाद गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान बोईंग 737 कोसळलं आहे. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी सुद्धा असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.या विमानात 242 प्रवासी होते. सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. अपघाताचे भयानक फोटो समोर येत आहेत. अहमदाबादच्या मेघानीनगर भागात आगीच्या प्रचंड ज्वाळा दिसल्या. दूरवरून काळ्या धुराचे लोट दिसत होते. प्राथमिक माहितीनुसार, सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा दुर्दैवी अपघात झाला. विमानतळाच्या सीमेजवळ हे विमान कोसळल्याचे मानले जात आहे. समोर आलेल्या सुरुवातीच्या छायाचित्रांमध्ये विमानाचे तुकडे झाले असल्याचे दिसून येते. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
अग्निशमन दलाचे जवान पाणी फवारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या आग काही प्रमाणात आटोक्यात आली आहे. ही दुर्घटना घडली तेव्हा विमान विमानतळावरून उड्डाण घेत होते. विमानाचे बहुतेक भाग जळून राख झाले आहेत. ज्या इमारतीवर विमान पडले त्या इमारतीचेही नुकसान झाले आहे. विमानतळाजवळ एक सिव्हिल हॉस्पिटल आहे, जिथे सर्व डॉक्टरांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादहून उड्डाण केलेले हे विमान लंडनच्या दिशेने जात होते.
विमानात क्रू मेंबर्ससह २४२ लोक होते. अहमदाबाद पोलिस नियंत्रण कक्षाने याची पुष्टी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते आणि अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच मेघानीनगरजवळ अपघात झाला. विमानतळापासून मेघानीनगरचे अंतर सुमारे 15 किलोमीटर आहे. अपघातानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्यास सुरुवात केली.
विमान अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये अपघातस्थळावरून आकाशात काळा धूर उठताना दिसत आहे. घटनास्थळी आपत्कालीन प्रतिसाद पथक तैनात करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी अद्याप अपघाताचे कारण निश्चित केलेले नाही. मेघानीनगर परिसरातील धारपूरमधून प्रचंड धूर दिसत आहे.












