विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला मिळणार व्यासपीठ; विविध विषयांतील संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण
वैभववाडी (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठाचे २१ वे अविष्कार संशोधन संमेलन २०२६-२७ सोमवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीने महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन होणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, नाविन्यपूर्ण कल्पना व सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे हा संमेलनाचा प्रमुख उद्देश आहे. या संमेलनात विविध विषयांतील विद्यार्थी संशोधक आपल्या संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण करणार आहेत. संशोधन कल्पना मांडण्याबरोबरच त्यांचे मूल्यमापन करून घेण्याची तसेच संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
या संमेलनासाठी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक सुनील पाटील तसेच विद्यापीठाच्या ओएसडी डॉ. मीनाक्षी गुरव यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अधिकाधिक महाविद्यालयांनी या संशोधन संमेलनात सहभागी होऊन ते यशस्वी करावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. आर. चव्हाण यांनी केले आहे.












