सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद
ओरोस (प्रतिनिधी) : सात वर्षीय अल्पवयीन बलिकेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेला 60 वर्षीय आरोपी विष्णू प्रसाद नौपाने ( मूळ नेपाळ , सध्या रा. कोचरा वेंगुर्ले ) याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश श्री. जे.पी.झपाटे यांनी नामंजूर केला. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. आरोपी विष्णू प्रसाद नौपाने याने 7 वर्षीय अल्पवयीन बालिकेला कार्टून दाखविण्याच्या बहण्याने खोली लगतच्या बागेत नेले. त्याठिकाणी पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. ही घटना 5 मार्च रोजी दुपारी घडली होती. याबाबत पीडितेच्या आईने निवती पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर आरोपी नौपाने याला अटक करण्यात आली होती. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी नौपाने याने दाखल केलेल्या जामीन अर्जाला सरकारी वकील रूपेश देसाई यांनी हरकत घेतली.आरोपी ने केलेले कृत्य हे अत्यंत घृणास्पद आणि गंभीर स्वरूपाचा लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपी हा परदेशातील असून न्यायालयीन सुनावणी स हजार राहणार नाही,जामीन मंजूर झाल्यास आरोपी पीडित, आणि साक्षीदार यांच्यावर दबाव टाकून त्यांना साक्ष देण्यापासून परावृत्त करू शकतो ह्या मुद्द्यांच्या आधारे आरोपीचा जामीन नामंजूर करण्यासाठी युक्तिवाद केला. सरकारी वकील रुपेश देसाई यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश जे.पी.झपाटे यांनी आरोपी नौपाने चा जामीन अर्ज नामंजूर केला.












