वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी वैभववाडी पंचायत समितीच्या नवीन बांधण्यात आलेल्या इमारतीची पाहणी करीत इमारतीच्या संपूर्ण कामाचा आढावा घेतला. यामुळे वैभववाडी पंचायत समितीच्या नवीन बांधण्यात आलेल्या इमारतीचा उद्घाटन सोहळा लवकरच होईल अशी अशा निर्माण झाली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री खेबुडकर यांनी वैभववाडी पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सभा घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी गेली बरीच वर्ष रखडलेल्या पंचायत समितीच्या नवीन इमारतीची पाहणी केली. सध्या इमारतीचे कंपाउंड वॉल, इमारतीवरील छप्पर,रंगरंगोटी, लाईट व्यवस्था तर फर्निचर चे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
वैभववाडी पंचायत समितीच्या इमारतीचे काम बरीच वर्ष रखडले होते. या इमारतीच्या बांधकामावरून अनेक प्रश्न उपस्थित करून निकृष्ट बांधकाम असल्याचे आरोप विरोधकांनी केले होते.आता इमारतीचे काम जवळपास पूर्ण झाले असून इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या भेटीमुळे इमारत उद्घाटनाचा मार्ग लवकरच मोकळा होईल असा विश्वास ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक उदय पाटील,उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत,उपअभियंता पंडितराव महाले, वैभववाडी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आर डी जंगले पंचायत समितीचे अधीक्षक श्री देसाई यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.












