जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या विद्यार्थ्यानी घेतला शेतीचा अनुभव

बांधावरची शाळा उपक्रमामध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांचा सहभाग

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील राज्यातील मॉडेल स्कूल म्हणून ओळख असणाऱ्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आज गुरवार दि. ३ जुलै २०२५ रोजी कणकवली तालुक्यातील कुरंगवणे या गावी शासनाच्या “बांधावरची शाळा” या उपक्रमाअंतर्गत येथील प्रगतशील शेतकरी निलेश ब्रम्हदंडे यांच्या भात शेतीला प्रत्यक्ष भेट देऊन भात लावणी कामाचा अनुभव घेतला.

विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शेतीबाबत आवड निर्माण व्हावी. शेतीची प्राथमिक माहिती त्यांना मिळावी. या हेतूने खारेपाटण केंद्र शाळा नं.१ शालेय विद्यार्थ्यांनी ‘एक दिवस बळीराजासाठी अर्थात बांधावरची शाळा’ हा उपक्रम खारेपाटण केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ प्राप्ती कट्टी, शाळेचे पदवीधर शिक्षक मिलिंद सरकटे, उपशिक्षिका समिधा राऊत व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी शेतकरी निलेश ब्रम्हदंडे यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन भातशेती विषयी अनेक प्रश्न विचारले. नांगरणी कशी होते ? भात लावणी कशी करतात?खत कोणतं वापरतात ? या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे शेतकरी ब्रम्हदंडे यांनी विद्यार्थ्यांना दिली. तसेच भात लागवडी संबंधी शास्रोक्त माहिती देखील त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिली.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी विद्यार्थ्यांना कोकणातील शेतकरी भात शेती करताना वापरत असलेल्या पारंपरिक शेती अवजारा विषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी शाळेच्या मुलांनी बांधावरची शाळा उपक्रमामध्ये सहभाग घेऊन प्रत्यक्ष शेती कामाचा अनुभव घेत आनंद लुटला.

error: Content is protected !!