बागायतीचे नुकसान; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
दोडामार्ग (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे गावामध्ये जंगली हत्तींच्या कळपाने आपला मोर्चा वळवला असून, शेती आणि बागायतीचे मोठे नुकसान केले आहे. गेले काही दिवस कोलझर-तळकट परिसरात वावरणाऱ्या या हत्तींनी आता झोळंब्यातही धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्री हत्तींच्या कळपाने झोळंब्यातील अमोल महाले यांच्या बागायतीला लक्ष्य केले. हत्तींनी काटेरी कुंपण तोडून बागेत प्रवेश केला. यामध्ये तेरा नारळाची झाडे, दोन जांभळाची झाडे आणि एक फणसाचे झाड मुळापासून तोडून टाकले आहे. याव्यतिरिक्त, बागेतील काजू आणि केळीच्या झाडांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
या परिसरामध्ये हत्तींनी ठाण मांडल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अमोल महाले यांनी झालेल्या नुकसानीबाबत दोडामार्ग वनविभागाला पत्र देऊन पंचनामा करण्याची आणि जंगली हत्तींचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. वनविभागाने यावर त्वरित उपाययोजना करावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.












