सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी शिरोडा मार्गावरील मळगाव घाटात आज दुपारी मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एक मोठे झाड रस्त्यावर कोसळले. या घटनेमुळे घाटातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. त्यानंतर एक दिशा मार्गाने वाहतूक सुरु होती. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
मळगाव घाटातील एका तीव्र वळणावर हे झाड कोसळल्याने, रस्त्यावर आडवे पडले. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाड उन्मळून पडले असावे. या घाटीत अजूनही अनेक झाडे कधीही कोसळण्याच्या बेतात अक्षरशः लटकत आहेत. त्यामुळे या घाटमार्गे ये-जा करणाऱ्या अनेक प्रवाशांना भितीच्या छायेखाली प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने झाड बाजूला करण्याचे काम हाती घेतले. कर्मचाऱ्यांच्या मदतीने झाड हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, झाडाचा आकार मोठा असल्याने आणि पावसामुळे कामात अडथळे येत आहेत. वाहतूक पूर्ववत होण्यासाठी काही वेळ लागण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.












