खारेपाटण (प्रतिनिधी) : खार पश्चिम येथील रतन वालावलकर टेक्निकल (RVT) हायस्कूलच्या दहावी – १९८८ बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी एक व्हाट्सअॅप गट तयार करून सामाजिक बांधिलकी जपत आषाढी एकादशीच्या निमित्ताने विरार येथील जीवन आनंद संस्थेच्या समर्थ आश्रमला पाणी शुद्धीकरण यंत्र व जेवण तयार करण्यासाठी कुकर तसेच जीवनावश्यक किराणा साहित्य अशा स्वरूपाचे वस्तुरूप देणगीचे सहाय्य करून एक स्तुत्य उपक्रम राबविला. यावेळी विद्यार्थी गटातील सदस्यांनी सुरेल भक्तिगीतांचा करावके कार्यक्रम सादर केला. तर या उपक्रमासाठी गटातील अजय सावंत, रफिक कोंडकर, संजय शेट्ये, संतोष साळसकर, राजेंद्र गायकवाड, संजय कांबळी, कुंदन करगुटकर आणि किशोर सोनवणे यांनी प्रत्यक्ष समर्थ आश्रमाला भेट देऊन आर्थिक वस्तूरुप सहकार्य केले.

या सदर प्रसंगी संस्थेचे संस्थापक संदीप परब तसेच विश्वस्त रामचंद्र अडसुळे, किसन चौरे, संस्थेचे स्नेही शैलेंद्र कदम व सुरज मोरे आणि आश्रमातील सेवा कर्मचारी भाईदास माळी, दीपक अडसुळे, दीपाली मेघा माळी, चंदा छेत्री, हेमलता पवार यांचेसह आश्रमातील बांधवांचा शाल, श्रीफळ देवून माजी विद्यार्थी गटाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी जीवन आनंद संस्थेच्या वतीने या सामाजिक उपक्रमाबद्दल माजी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करून त्यांच्या या प्रेरणादायी कार्यामुळे इतरांनीही पुढे येऊन मदतीचा हात द्यावा, असे आवाहन आश्रमच्या वतीने करण्यात आले आहे.












