अभिमानास्पद ! सिंधुकन्या नयोमी साटम सिंधुदुर्ग च्या अप्पर पोलीस अधीक्षक

साटम यांचे कणकवली तालुक्यातील पिसेकामते मूळगाव

पहिल्याच प्रयत्नात झाल्या होत्या यूपीएससी उत्तीर्ण

ओरोस (प्रतिनिधी) : कृषीकेश रावले यांची बदली झाल्याने रिक्त झालेल्या जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी या पदावर कार्यरत असलेल्या नयोमी दशरथ साटम यांची पदोन्नतीने शासनाने नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे साटम या मूळ कणकवली तालुक्यातील पिसेकामते-फळसेवाडी येथील असून त्यांचे कुटुंबीय मुंबई येथे वास्तव्याला असते. सहाय्यक पोलीस अधीक्षक चंद्रपूर येथून त्यांची सिंधुदुर्ग येथे बदली झाली आहे. नयोमी यांचे मूळ गाव पिसेकामते फळसेवाडी असले तरीही त्यांचे प्राथमिक शिक्षण दहिसर मुंबई येथे झाले. सेंट जेवियर कॉलेजमधून इकॉनॉमिक्स या विषयातून 2019 मध्ये त्यांनी पदवी संपादन केली. पदवी संपादन करतानाच त्यांनी यूपीएससीची परीक्षा देण्याचे निश्चित केले होते. पदवीधर होताच त्यांनी बेंगलोर येथे यूपीएससीसाठी क्लास जॉईन केला. त्यावेळी कोरोनामुळे त्यांना क्लास सोडून पुन्हा मुंबईला परतावे लागले होते. मात्र त्याही परिस्थितीत त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण करत 2020 मध्ये त्यांनी पहिल्यांदाच यूपीएससी परीक्षा दिली त्या परीक्षेत त्या 162 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या होत्या. सिंधू कन्येची सिंधुदुर्गच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

नवीन अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम या मुंबई येथील बोरीवली (पूर्व) येथे सध्या स्थायिक आहेत. २०२१ बॅचच्या त्या अधिकारी आहेत. त्या आता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नवीन अपर पोलीस अधीक्षक म्हणून रुजू होणार आहेत. कृषीकेश रावले यांची बदली झाल्याने हे पद रिक्त होते. महिनाभरापूर्वी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर नव्याने रुजू झाले आहेत. आता पोलीस यंत्रणेचे दोन्ही प्रमुख अधिकारी नव्या दमाचे असल्याने त्यांच्याकडून कशाप्रकारे कारभार हाकला जातो, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

error: Content is protected !!