धान्य न उचलल्यास शिधापत्रिका होणार केशरी

जिल्हा प्रशासनाचा इशारा ; पात्र लाभार्थ्यांचे तीन महिन्यांचे धान्य पडून

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील पात्र अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांसाठी जिल्हा प्रशासनाकडून महत्त्वाचे आवाहन करण्यात आले. यात ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही मागील तीन महिन्यांचे धान्य उचलले नाही. त्यांनी ते तात्काळ उचलावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दरम्यान धान्य न उचलल्यास, अशा लाभार्थ्यांना धान्याची गरज नाही, असे समजून त्यांच्या प्राधान्य कुटुंब लाभार्थी आणि अंत्योदय शिधापत्रिका केशरी रंगाच्या शिधापत्रिकेत वर्ग करण्यात येतील. त्यानंतर त्यांना धान्याचा लाभ घेता येणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांनी या सूचनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित आपले थकीत धान्य उचल करून घ्यावे. जेणेकरून त्यांना भविष्यात मिळणाऱ्या धान्याच्या लाभापासून वंचित राहावे लागणार नाही. वास्तविक पाहता पात्र लाभार्थ्यांना ३० जूनपर्यंत धान्य उचल करण्याचे आवाहन यापूर्वीच करण्यात आले होते. परंतु अद्यापही जिल्ह्यातील काही लाभार्थ्यांनी धान्याचा लाभ घेतलेला नाही, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जुलै महिन्यातही ई-पॉस मशीनद्वारे धान्य उचलण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या लाभार्थ्यांनी अजूनही धान्य उचल केली नाही, त्यांनी त्वरित ती पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!