एडगांव नं १ शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी विद्यार्थी व कृषीकन्यांकडून रानभाज्यांचे प्रदर्शन 

वैभववाडी (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर विद्यामंदिर एडगांव नंबर १ शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न झाली. यावेळी गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचे व शिक्षकांचे विद्यार्थ्यांनी पूजन केले व आपल्या गुरूंप्रती आदरभाव व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या पालकांचा गुरुजन म्हणून विद्यार्थ्यांनी सन्मान केल्याने पालकवर्गाने या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रताप रावराणे यांनी सांगितले की, गुरुशिष्य परंपरेचा फार मोठा प्रभाव आपल्या भारतीय संस्कृतीवर आहे. आजच्या परिस्थितीत शिक्षकांच्या भूमिकेत मार्गदर्शक, सुलभक इत्यादी बदल होत असले तरी गुरूचे स्थान प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अढळ आहे. शाळा स्तरावर शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांच्या आई, वडील, पालक यांचा सन्मान केल्यामुळे विद्यार्थ्यांत आपल्या गुरुंविषयी व आपल्या आईवडीलांविषयी आदरभाव व निष्ठा अधिक वृद्धिंगत होईल. तसेच आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख होऊन त्यांचावर योग्य संस्कार लहान वयात करणे शक्य होईल. यावेळी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शाळेत सांगुळवाडी येथील कृषीकन्या यांनी रानभाज्या प्रदर्शन देखील आयोजित केले होते. यामध्ये शालेय मुलांना आपल्या परिसरातील रानभाज्याची ओळख व महत्त्व पालकांच्या उपस्थितीत पटवून देण्यात आले. रानभाज्या प्रदर्शनात कुर्डु, काटले, अळू, भारंगी, हिरवा माट, लाल माट, कुड्याच्या शेंगा, शेवगा, सुरण, पांढरे अळू, टाकळा, पेवगा, काट माट इत्यादी भाज्या मांडण्यात आल्या होत्या. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रताप रावराणे, महेश पाटील, हेमंत पाटील, अंगणवाडी सेविका नेहा पवार, रुची पवार, आरुषी बोडेकर, प्रभाकर सावंत, योगेश पवार, प्रसिद्धी पवार, सानिका सावंत, नेत्रा गुरव, वनिता पवार, कविता जगताप व सांगुळवाडी कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्या सिमरन इनामदार, सिमरन तळपाडे, साक्षी गायकवाड, वैष्णवी वालणकर, वेदश्री घाग, समीक्षा बराले, साक्षी पाटील, समृद्धी नाईक उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दिप्ती पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन चेतन बोडेकर यांनी केले.

error: Content is protected !!