सावंतवाडी (प्रतिनिधी) : शिरवल येथील प्राणजीवन सहयोग संस्थेमार्फत झाराप मधील जिल्हापरिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना 450 रेनकोट चे मोफत वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील पाच हजार विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप करण्याचा प्राणजीवन सहयोग संस्थेचा मानस आहे. त्याची सुरुवात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप चौकेकर यांनी कणकवली तालुक्यातील शाळांपासून केली होती. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील मुलांना हे रेनकोट वाटप करायचे आहे.
प्राणजीवन सहयोग संस्थेमार्फत समाज उपयोगी अनेक उपक्रम राबवले जातात. कोरोना कालावधीत प्राणजीवन सहयोग संस्थेमार्फत संस्थापक अध्यक्ष संदीप चौकेकर यांनी स्तुत्य उपक्रम राबवले होते. झाराप येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये रेनकोटचे वाटप करतेवेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप चौकेकर, संस्था प्रतिनिधी गीतेश शेणई, धनंजय गडेकर, प्राध्यापक गणपत शिरोडकर, शेखर पाडगावकर, चंद्रकांत जाधव तसेच शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालक वर्ग उपस्थित होता.












