चौके (प्रतिनिधी) : कोणताही छंद शंभर दिवस जोपासला की त्याचे रूपांतर व्यवसायात उद्योगात होते. त्यामुळे प्रत्येकाने छंद जोपासायला हवा. सध्या नोकरी मिळणे अशक्य झाले आहे. विद्यार्थांनी आताच आपले ध्येय निश्चित केले पाहिजे, असे प्रतिपादन प्रतिभा फिशरीज डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह सोसायटी मर्यादित सिंधुदुर्गचे सदस्य अभिमन्यू गावडे शोभिवंत/रंगीत मासे तज्ञ आणि उद्योजक यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व सरस्वती मातेला हार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी स्वतःचे कौशल्य वापरून बनविलेल्या विविध वस्तूच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारून त्यांचे कौतुक केले. सूत्रसंचालन अभियांत्रिकी विभागाचे निदेशक जगन्नाथ आंगणे यांनी केले तर टिपणी वाचन आणि लँड अ हॅन्ड इंडिया संस्थेची उद्दिष्टे तसेच स्कॉलरशिपची माहिती प्रस्ताविकांमध्ये ऊर्जा पर्यावरण विभागाचे निदेशक केशव भोगले यांनी दिली.
प्रमुख अतिथी श्री. गावडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना शोभिवंत रंगीत मत्स्यपालन यावर विद्यार्थ्यांना उत्तम माहिती दिली तसेच आपल्या प्रशालेत लवकरच त्याचे प्रात्यक्षिक घेण्यात येईल, अशी ग्वाही दिली. तसेच भविष्यात वेळोवेळी सहकार्याची तयारी दर्शविली. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रशालेचे मुख्याध्यापक पी.एच. कुबल यांनी विविध गोष्टी सांगून कौशल्य दिनाचे महत्त्व पटवून दिले.

आपल्या प्रशालेत शिकलेले विद्यार्थी सध्या देशात परदेशातपण आपला ठसा उमटवून शाळेचे गावचे स्वतःचे नाव रोशन करत आहेत तर बरेच विद्यार्थी व्यवसाय उद्योग करत आहेत. त्यांचा आदर्श ठेवून पुढे जा म्हणजे यशस्वी व्हाल, असे मार्गदर्शन केले. यावेळी प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका वेदिका दळवी, सहाय्यक शिक्षिका प्रतिभा केळुसकर उपस्थित होत्या. आभार प्रदर्शन गृह आरोग्य विभागाच्या निदेशिका हर्षदा पाटकर यांनी मानले.











