माजी आमदार जठार यांच्या मागणीनुसार सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवसृष्टी उभारा
कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासावरून फसवत आहेत. पालकमंत्री नितेश राणेंनी वाढवण बंदरात किमान कौशल्य आधारित प्रशिक्षण साठी बैठका घेतल्याचे म्हटले पण प्रत्यक्षात शिकविण्यासाठी किती टेक्निकल स्टाफ आयटीआय मध्ये आहेत याचा आढावा घेतला काय ? असा सवाल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी उपस्थित केला.
खासदार राणेही बैठकी घेऊन जनतेला फसवत आहेत. पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पदे रिक्त आहेत. पिडब्ल्यूडी ची दोन्ही कार्यकारी अभियंता पदे रिक्त आहेत. अधीक्षक अभियंता पदसुद्धा रिक्त आहे. जिल्ह्यात सगळे रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे यावर्षीही गणपती बाप्पाचे आगमन खड्ड्यांतून होणार आहे. हायवे फ्लायओव्हर चे वाय ब्रिज उभारण्याची घोषणाही केली होती, तीसुद्धा हवेतच विरली आहे. राजकोट किल्ल्याजवळ शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यासाठी 30 लाख रुपये प्रतिगुंठा दराने जमीन खरेदी केली जाणार आहे. एकीकडे सिवर्ल्ड साठी हजार रुपये दराने जमीन अधिग्रहित केली. तर दुसरीकडे 30 लाख गुंठा दराने शिवसृष्टी साठी जमीन खरेदी करून भ्रष्टाचार करत आहेत. शिवरायांनी उभारलेल्या सिंधुदुर्ग किल्ला जतन करा. भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी मुंबईत अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक उभारण्याऐवजी सिंधुदुर्ग किल्ल्यावर उभारण्याची मागणी केली होती. जठार यांच्या मागणीचा विचार करून शिवसृष्टी साठी करोडो रुपये खर्च घालण्यापेक्षा सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवसृष्टी उभारावी, असेही उपरकर म्हणाले.











