वैभववाडीत अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूलमध्ये रानभाजी महोत्सव संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समृद्ध जंगलसंपदा आणि त्यातून मिळणाऱ्या आरोग्यवर्धक रानभाज्यांचा सन्मान करण्यासाठी वैभववाडीत भव्य रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल आणि कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आठवडा बाजाराच्या निमित्ताने हा महोत्सव पार पडला. शहरी भागातील नागरिकांना रानभाज्यांची ओळख व्हावी, त्यांचे महत्त्व समजावे व त्यांना त्या खरेदी करण्यासाठी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी कुर्डू, टाकळा, घोळ, कुड्याच्या शेंगा, माठ, ओव्याची पाने, भारंगी, पाथरी, पेवगा, सुरण, शेवगा, केळीचा कोंब, खडक तरी, ओव्याची पाने, कर्टुल, कणकीचा कोंब, गवती चहा अशा अन्य रानभाज्यांचे स्टॉल शालेय परिसरात उभारले आहे. प्रदर्शनात येणाऱ्या नागरिकांना विद्यार्थी रानभाज्यांचे आरोग्याच्या दृष्टीने आहारातील महत्त्व सांगत होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जंगल अत्यंत समृद्ध आहे. येथील जैवविविधता पर्यावरणाच्या दृष्टीने तर उपयुक्त आहेच. मात्र, मानवी जीवनालाही निरोगी बनविण्याचे सामर्थ्य त्यात आहे. जिल्ह्यातील पर्यावरण स्थितीचा विचार केल्यास अनेक प्रकारच्या रानभाज्या उगवण्यास येथील हवामान फार पोषक आहे. मानवी आरोग्याला ज्या सकस अन्नाची गरज लागते, ते अन्नघटक पुरविण्याची क्षमता येथील रानभाज्यांमध्ये आहे. जिल्ह्यात अनेक रानभाज्या आढळतात. प्रत्येक रानभाजीत औषधी गुणधर्म आहेत. टाकळा, कुडा, पाथरी, शेवगा, अळू, पानांचा ओवा, कुर्डू, काटेमाट, सुरण, उंबर, गुळवेल यासारख्या अनेक रानभाज्या जिल्ह्याच्या जंगलात पावसाळ्यात विपूल प्रमाणात आढळतात. रानभाज्या नैसर्गिक पद्धतीने वाढलेल्या असतात. त्यात खते व कीटकनाशके नसतात. अलिकडे विविध आजारांचे प्रमाण प्रचंड वाढले. याला कारण चुकीचा आहार होय. अशी माहिती विद्यार्थ्यांनी नागरिकांना सांगत योग्य आहार कसा असावा याची माहिती दिली.

पावसाळ्यात तरारून उगवणाऱ्या रानभाज्या चवदार व औषधी गुणधर्मांनी समृद्ध असतात- कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे

रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, निवासी नायब तहसीलदार शिवाजी सुतार, पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्याहस्ते प्रभारी कृषी अधिकारी उत्तम मंदावाड, कृषी सहाय्यक विशाल मुळे, वैभववाडी वनपाल, अनिता बोडेकर, वाभवे -वैभववाडी नगराध्यक्षा श्रध्दा रावराणे, आरोग्य व शिक्षण सभापती रोहन रावराणे, वैभववाडी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा समिती शंकर हुले यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. प्रशालेच्या वतीने सर्व प्रमुख मान्यवरांना पुष्पगुच्छ व रानभाज्या देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, पत्रकार महेश रावराणे, संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांना रानभाज्यांचे आरोग्याच्या दृष्टीने आहारातील महत्त्व याबाबत माहिती दिली. सध्याच्या शेतीमध्ये रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात होणारा वापर, संकरित बियाणे यामुळे आपल्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले. पावसाळ्यात तरारून उगवणाऱ्या रानभाज्या चवदार व औषधी गुणधर्मांनी समृद्ध असतात, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

महोत्सवात प्रशालेच्या सर्व वर्गांच्या वतीने शालेय परिसरात रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले होते. त्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशालेच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
हिरव्या भाज्या, रानभाज्या व रानफळे आरोग्यवर्धक असतात. आजारांवर मात करण्यासाठी रानभाज्या उपयुक्त ठरतात. हा संदेश लोकांना पटवून देण्याचे कार्य या रानभाजी महोत्सवातून करण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक बी. एस. नादकर, संस्थेचे संचालक विजय रावराणे, निवासी नायब तहसीलदार शिवाजी सुतार, वैभववाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर, प्रभारी कृषी अधिकारी उत्तम मंदावाड, कृषी सहाय्यक विशाल मुळे, वैभववाडी वनपाल, अनिता बोडेकर, वाभवे-वैभववाडी नगराध्यक्षा श्रध्दा रावराणे, आरोग्य व शिक्षण सभापती रोहन रावराणे, वैभववाडी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा समिती शंकर हुले, शेतकरी विनोद रावराणे, प्रताप रावराणे, राजु पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तेजस आंबेकर, पत्रकार महेश रावराणे, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन व नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख आर.बी. जाधव यांनी केले.

error: Content is protected !!