झाराप-साळगाव-माणगाव रस्ता खड्ड्यांनी भरला

त्रस्त नागरिकांची रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी

कुडाळ (प्रतिनिधी) : झाराप-साळगाव-माणगाव मार्गाची सध्या अत्यंत खराब अवस्था झाली असून, रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचले असून, खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. साळगाव आणि माणगाव परिसरातील नागरिक कुडाळ येथे येण्यासाठी याच मार्गाचा मुख्यत्वे वापर करतात. मात्र, सध्या या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत घेऊन चालण्यासारखे झाले आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, पादचाऱ्यांवर चिखलाचे पाणी उडाल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक ग्रामस्थ व प्रवासी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (PWD) तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. “आमच्या रोजच्या प्रवासात हा रस्ता मोठा अडथळा ठरतो आहे. पावसात तर खड्डे दिसतही नाहीत. वेळप्रसंगी रुग्णवाहिका किंवा शालेय वाहनेही खोळंबतात. प्रशासनाने या रस्त्याचे त्वरित दुरुस्ती काम सुरू करावे,” अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

error: Content is protected !!