खारेपाटण येथे महिलांसाठी विशेष प्लंबिंग प्रशिक्षण वर्गाचे आयोजन
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण व ज्ञानदा इन्स्टिट्यूट ऑफ फ्लो पायपिंग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शेठ न. म. विद्यालय व जुनिअर कॉलेज खारेपाटण येथे पंचक्रोशीतील महीलांसाठी नुकतेच विशेष प्लंबीग प्रशिक्षणाचे आयोजन ज्ञानदा शिक्षण संस्था पुणे चे संचालक मिलिंद डांगे व मोबिलायझेशन ऑफिसर सोमनाथ कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण ही संस्था नेहमीच शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहे. यामधील एक उल्लेखनीय बाब म्हणजे १० जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर ज्ञानदा इन्स्टिट्यूट ऑफ फ्लो पायपिंग पुणे यांच्या सहकार्याने प्लंबिंग कोर्सेसची उपलब्धता पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना करून देण्यात आलेली आहे. आज या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांसाठी मोफत प्लंबिंग कोर्सची उपलब्धता करून देण्याचा मानस ज्ञानदा इन्स्टिट्यूट पुणे यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. प्लंबिंग या कार्यक्षेत्रामध्ये प्रथमच महिलांना प्रशिक्षण देणारी कार्यशाळा ज्ञानदा इन्स्टिट्यूट पुणे यांच्या माध्यमातून खारेपाटण हायस्कूलमध्ये सुरू करण्यात आली.
या कोर्स संदर्भात मार्गदर्शन वर्गाचे आयोजन खारेपाटण हायस्कूलमध्ये नुकतेच करण्यात आले होते. यावेळी संस्था ज्ञानदा इन्स्टिट्यूट पुणे चे संचालक मिलिंद डांगे साहेब, मोबिलायझेशन ऑफिसर सोमनाथ कुलकर्णी, अमित नाईक खारेपाटण हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सानप रोटरी क्लब ऑफ खारेपाटणचे अध्यक्ष दयानंद कोकाटे हे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित होते. तर प्रशालेच्या वतीने प्राचार्य सानप यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. या प्रशिक्षणासाठी खारेपाटण पंचक्रोशी मधील महिलांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. ज्ञानदा इन्स्टिट्यूट पुणे यांच्या या अभिनव उपक्रमाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ,खारेपाटणचे अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे उपाध्यक्ष रघुनाथ राणे सचिव महेश कोळसुलकर, सर्व विश्वस्त, प्राचार्य संजय सानप व उपस्थित सर्व महिलांनी आभार व्यक्त केले.











