रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या मुलींच्या घोळक्यात घातली कार
महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू तर दोघी गंभीर जखमी
कोल्हापूर (प्रतिनिधी) : एखाद्याची मजा इतरांच्या जीवाशी कशी येते, याचं उदाहरण कोल्हापुरात दिसून आलं आहे. तरुणांनी स्टंट करताना कारवर नियंत्रण गमाविल्यानं बसस्टॉपवर बसची वाट पाहणाऱ्या तरुणींच्या घोळक्याला कारनं जोरदार धडक दिली. हा अपघात कोल्हापुरातील भोगावती महाविद्यालयाच्या परिसरात घडला. अपघातात महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तिघी गंभीर जखमी झाल्या आहेत. प्रज्ञा कांबळे असे मृत विद्यार्थिनीचं नाव आहे.कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील कुरुकली इथं कॉलेज संपल्यानंतर घरी जाण्यासाठी महाविद्यालयीन तरुणी बसची वाट पाहत होत्या. यावेळी महाविद्यालयाकडून बस थांबा असलेल्या रस्त्यावर काही तरुणांची भरधाव वेगानं चारचाकीसोबत स्टंटबाजी सुरू होती. त्यांनी स्टंटबाजीच्या नादात राधानगरी कोल्हापूर मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या मुलींच्या घोळक्यामध्ये कार घातली. यावेळी कारनं चार मुलींना जोराची धडक दिली. कारनं काही अंतरावर रस्त्यावरून फरपटत नेलं. भरधाव कारची धडक बसल्यामुळे राधानगरी तालुक्यातील कौलवची विद्यार्थिनी प्रज्ञा दशरथ कांबळे गंभीर जखमी झाली. स्थानिकांनी तिच्यासह अन्य तीन महाविद्यालयीन विद्यार्थिनींना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र, रक्तस्त्राव झाल्यानं प्रज्ञा कांबळेचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या अस्मिता अशोक पाटील (रा. कौलव), श्रावणी उदय सरनोबत (रा. कसबा तारळे) आणि श्रेया वसंत डोंगळे (रा. घोटवडे) यांना खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
स्थानिकांनी केला कारचा पाठलाग- अचानक घडलेल्या या घटनेमुळे बस थांब्यावर उभ्या असलेल्या सुमारे 50 मुली गोंधळून गेल्या होत्या. स्थानिकांनी धडक देऊन अपघात करणाऱ्या कारचा पाठलाग केला. मात्र, ठिपकुर्ली फाट्यानजीक कारमधील चार तरुणांपैकी दोघांनी पळ काढला. करवीर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे. या अपघातात तरुणीचा हकनाक जीव गेल्यानं कोल्हापूर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
तरुणाच्या वडिलासह चुलत्याला अटक- अपघाताची माहिती समजतात परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटीचा आधार घेऊन तरुणाचे वडील सुरेश साताप्पा परीट आणि चुलते जितेंद्र साताप्पा परीट यांना ताब्यात घेतल्याची माहिती करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली. या अपघाताची नोंद करवीर पोलीस ठाण्यामध्ये झाली असून पोलीस अधिक तपास पोलीस करत आहेत.











