गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची रेल्वे तिकीटांसाठी धावपळ!
मुंबई (प्रतिनिधी) : कोकणातील नियमित रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा यादी हजारपार होण्याचे प्रकार याआधी झाले आहेत. तर, आता गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याची घोषणा करण्यात आली असून या रेल्वेगाड्यांचे आरक्षण सुरू झाल्यानंतर, एका मिनिटात प्रतीक्षा यादी सुरू होते. त्यामुळे बहुसंख्य मुंबईस्थित कोकणवासीयांना आरक्षित तिकीट मिळू शकले नाही. तर, काही रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा यादी हजारपार गेल्याने तिकीट मिळणे कठीण झाले आहे.
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. परंतु, रेल्वेचे आरक्षित तिकीट मिळत नसल्याने कोकणवासीयांना एसटी किंवा खासगी बसचे तिकीट काढून प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे जादा पैसे आणि प्रवासासाठी कोकणात अधिक वेळ यात वाया जाणार आहे. गणेशोत्सवानिमित्त जाणाऱ्यांना रेल्वेचे आरक्षित तिकीट मिळावे यासाठी रेल्वे प्रशासनाने २५० विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचे नियोजन केले आहे. मात्र, या विशेष रेल्वेगाडीचे विशेष शुल्क देऊनही आरक्षित तिकीट मिळत नसल्याने प्रवासी गोंधळात पडले आहेत.
तिकीट रद्द केल्यास ६० रुपये भुर्दंड
या वर्षी २७ ऑगस्ट रोजी गणेशोत्सव असून, २५ आणि २६ ऑगस्ट रोजीचे तिकीट काढणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या दिवशी सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांची तिकिटे मिळणे कठीण झाले आहे. २४ जुलै रोजी आरक्षित तिकीट मिळण्यासाठी, प्रवासी सकाळी ७.३० वाजेपासून तयारीत होते. सकाळी ८ वाजता तिकीट काढण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर एका मिनिटात प्रतीक्षा यादीची क्षमता पूर्ण झाल्याने ‘रिग्रेट’ असा संदेश आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर येऊ लागला. तर एलटीटी-सावंतवाडी विशेष रेल्वेगाडीची प्रतीक्षा यादी हजारपार गेली. त्यामुळे ६० टक्के मयदिच्या नियमांचे पालन झाले नाही, तर प्रतीक्षा यादीतील तिकिटे अनेकांनी रद्द केली. त्यामुळे प्रत्येक तिकिटामागे ६० रुपये शुल्क आकारण्यात आले. एका कुटुंबातील ४ ते ५ जणांचे तिकीट रद्द केल्यामुळे २४० ते ३०० रुपयांचे नुकसान सोसावे लागले.











