“कुणी पालकत्व घेता काsss” फोंडाघाटच्या स्थानिक ग्रामस्थांची दबक्या आवाजात साद

विकसनशीलतेच्या उंबरठ्यावरील गावाकडे सर्वांचेच दुर्लक्ष! बेशिस्त, नियोजन शून्यता, अरेरावीचा सुकाळ

फोंडाघाट (कुमार नाडकर्णी) : एकीकडे प्रशासन आणि सरकार गतिमान विकासाची दिवा स्वप्न दाखवत असताना, घाटमाथ्याच्या पायथ्याशी आणि पर्यटन विकासाच्या प्रवेशद्वारावर विकसनशीलतेकडे उभे असलेले फोंडाघाट गाव गेले दहा-पंधरा वर्षे उपेक्षितच आहे. त्यामुळे फोंडाघाटवासिय जनता दबक्या आवाजात आणि चव्हाट्यावरील चर्चेत कुणी पालकत्व घेता का sss फोंडाघाटचे! अशी आर्त अपेक्षा जिल्ह्यातील सक्षम नेतृत्वाकडून करताना आढळत आहेत.

कोरोनामध्ये फोंडाघाटचे सक्षम आणि सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाणारे नेतृत्व स्व. सुदन बांदिवडेकर निघून गेल्यानंतर, येथील स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यावरील विश्वासाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने राणे कुटुंबीयांचे त्यांच्या दुर्लक्षातून दिसून येत आहे. याला अनेक कारणे-कंगोरे असले तरी गेल्या तीन निवडणुकीमध्ये फोंडाघाट मधील जनतेने सदैव राणे कुटुंबियांना भरभरून दान दिले आहे. मात्र विकास कामात लोरे नंबर एक फोंडाघाटच्या पुढे गेल्याचे चित्र, येथील नेतृत्वाला विचार करण्यास भाग पाडणारे आहे. कदाचित ते पाठपुराव्यात आणि नेतृत्वाचा विश्वास संपादन करण्यात कमी पडले असावे.

सत्ता बदलल्यानंतर फोंडाघाट मध्ये शिंदे (शिवसेना)-भाजप नेतृत्वाला विरोधकच नगण्य आहेत. किंबहुना त्यातही रोज घडविण्यात येणाऱ्या पक्षप्रवेशामुळे कोणाचाही प्रतिकार नाही. ठेकेदारांची एकाधिकारशाही, आम्ही करू ती पूर्व दिशा, आमचे कुणी काही करू शकत नाही? ही येथील स्थानिक कार्यकर्त्यांची मानसिकता यामुळे मुजोरी वाढीस लागून, हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच जणांचे हित पहिले जात आहे. याचा थेट परिणाम विकास कामावर होऊन गाव मागे पडत चालले आहे. ग्रामपंचायत, महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, शैक्षणिक विभाग, पाटबंधारे विभाग, आरोग्य विभाग, व्यवसाय, प्रशासकीय योजना या सर्वच बाबतीत गावातील विविध कामांमध्ये भ्रष्टाचार आणि दादागिरीची भाषा विकासाला पोखरत आहे. म्हणूनच सर्वसामान्य जनतेने आणि समजूतदार नागरिक गावाला सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे दबावामुळे दबक्या आवाजात बोलत असून, गावाचे पालकत्व कोणीतरी घेण्याची आग्रही मागणी जोर धरत आहे. किंबहुना शंभर टक्के जिल्ह्याचे पालकत्व घेतलेल्या पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे फोंडाघाट गावचे एक टक्का पालकत्व स्वीकारण्याची सार्थ अपेक्षा सर्वांकडून केली जात आहे.

गेली तीन-चार वर्षे फोंडाघाट ग्रामपंचायत वर समीर सामंत यांनी माहितीच्या अधिकारात माहिती घेऊन केलेल्या भ्रष्टाचार-मनमानी आणि जनतेच्या पैशाचा अपव्यय या तक्रारींचे, लाल फितीत अडकलेल्या प्रशासकीय यंत्रणेमुळे, अधिकाऱ्यांमुळे, सरपंच आणि ग्रामसेवक उत्तर अथवा न्याय देऊ शकले नाहीत. ग्रामपंचायतच्या गलथान कारभाराचा, बेशिस्त निर्णय क्षमतेचा फटका जनतेला सहन करावा लागतो आहे. ग्रामपंचायत मध्ये वावरणाऱ्या तथाकथीत स्थानिक पाच-सहा नेत्यांमुळे आणि त्यांच्या दादागिरीमुळे या गोष्टींना समर्थन मिळत आहे.

डाव्या तीर कालव्याचा गेले कित्येक वर्षे प्रलंबित प्रश्न शेतकऱ्यांचे पाणी हिरावून घेत आहे. गावाचे विभाजन करून ग्रीन झोनच्या निर्णयामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. तालुक्यात अद्यापही नसलेल्या, फोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळणे गरजेचे आहे. त्याचा लाभ दशक्रोशीतील रुग्णांना होणार आहे. १ कोटी ७७ लाखाच्या आणि ६००मीटर लांबीच्या, बाजारपेठेतील ठेकेदाराच्या मनमानी, गलथान कामामुळे अपुरा राहिलेल्या रस्त्याने व्यापाऱ्यांचे हाल वाढवले आहेत. रस्त्यावरील खड्डे ज्वलंत प्रश्न असून यामुळे कित्येकांना अपघात आणि प्राणाला मुकावे लागले आहे. एसटी स्थानक वरील सुविधांकडे वारंवार कळूवूनही संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. बेशिस्त पार्किंग, पिण्याच्या पाण्याची असुविधा, शौचालय, दुकानाची अनियोजनबद्ध उभारणी या असुविधा आहेत. आरटीओची पेठेऐवजी घाटात उभी असलेली तीन-चार पथके? यामुळे सर्व घाट बंद असल्यावर पेठेतील बेशिस्तीमुळे होणारी वाहनांची कोंडी सर्वांनाच त्रासदायक ठरत आहे. रस्त्यावरील व्यापारी दुचाकी, चारचाकी वाहनांचे बेशिस्त अतिक्रमण याला जबाबदार ठरते. यावर कुणाचेच नियंत्रण नाही. पेठेतील सीसीटीव्ही सुद्धा गेले कित्येक वर्ष बंद आहेत. शांतता आणि सुव्यवस्थेसाठी ते तातडीने सुरू होणे आवश्यक आहे. चुकीच्या ठिकाणी वाहनाच्या चेक पोस्ट निर्मिती सर्वांनाच त्रासदायक आहे.

वीज मंडळ, ग्रामसेवक, तलाठी-सर्कल, कृषी सहायक यांची अनियमित सेवा व तात्पुरती नेमणूक यामुळे लोकांची कामे रखडलेली राहतात. आयटीआय ला स्वर्गीय बापूसाहेब प्रभूगावकर यांचे नामकरण होणे गरजेचे आहे. डी बार झालेले ट्रेड्स बदलून नवीन विकासाभिमुख आणि व्यवसायाभिमुख ट्रेड सुरू करून मुलांच्या हातांना काम मिळणे गरजेचे आहे. ग्रामदेवताच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांचे खडीकरण-डांबरीकरण होऊन त्यांना पर्यटन दृष्ट्या विकास निधीची गरज आहे.

“पोलीस स्टेशनची मागणी” – प्रत्येक घटनेसाठी ग्रामस्थांना किंवा गोरगरिबांना कणकवली गाठावी लागते. गेले कित्येक वर्षे फोंडाघाट ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व इतर योजनेतून सुरू असलेली कामे निकृष्ट दर्जाची असून त्याची प्रशासकीय चौकशी होणे गरजेचे आहे. सुरक्षित असलेला घाट रस्ता असुरक्षित होत आहे. याकडे बांधकाम विभागाकडून एम. एस. आर. टी. सी. कडे हस्तांतरित झालेल्या रस्त्याचे काम कुर्मगतीने सुरू असल्याने त्यावर कोणाचेच वचक नाही किंवा विचारण्यासाठी ऑफिसही नाही. कित्येक वर्ष गाळाने भरलेल्या उगवाई नदीचे पुनर्भरण होणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

इत्यादी अनेक गोष्टी स्थानिक नेत्यांनी जिल्ह्याच्या नेत्यांना अथवा पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या का? हा प्रश्नच आहे. मात्र ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, योजना, रस्ते, पाणंद, गडगे, संरक्षक भिंती यांच्या कामासाठी धावणारे स्थानिक चार-पाच ठेकेदार आणि त्यांना पाठीशी घालणारे, यांनी याकडे लक्ष देणे, पाठपुरावा करणे गावच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा नाक्यावरील चर्चांना आणि संध्याकाळच्या गप्पा मधून उमटणाऱ्या “कोणी पालकत्व घेता काsss” ह्या आर्त अपेक्षांना उत्तर मिळू शकेल.

error: Content is protected !!