पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते कणकवली येथे होणार पुरस्कार वितरण
कणकवली (प्रतिनिधी) : युवा संदेश प्रतिष्ठान यांच्यावतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना युवा संदेश आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. युवा संदेश प्रतिष्ठानच्या तज्ञ कमिटीमार्फत कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव न मागवता शालेय विद्यार्थी, पालक, शालेय परिसरातील ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करून आदर्श शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
सन 2025 या वर्षांसाठी जिल्हा परीषद विभागमधून जि. प. शाळा तळवणे नं. 1, ता. सावंतवाडी येथील बापूशेट प्रभाकर कोरगावकर तर हायस्कूल विभागमधून एस. एम. हायस्कूल कणकवलीच्या दिव्या दिवाकर बाणे यांची निवड करण्यात आली आहे. सदर शिक्षकांना रविवार 27 जुलै, 2025 रोजी सकाळी ठीक 10:30 वा. भगवती मंगल कार्यालय कणकवली येथे होणार्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा (STS) बक्षिस वितरण कार्यक्रमात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, सिंधुदुर्ग शिक्षाधिकारी गणपती कमळकर उपस्थित राहणार आहेत.
युवा संदेश आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण करण्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे 8 वे वर्ष असून शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कारमूर्तींचे माजी जि. प. अध्यक्ष संजना संदेश सावंत आणि युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.











