जलद गाड्यांना थांबा देण्याच्या मागणीसाठी जनआंदोलन
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कोकण रेल्वे मार्गावरुन धवणाऱ्या सर्व लांब पल्याच्या जलद गाडयांना सिंधुदुर्ग स्थानकावर थांबा मिळावा. तसेच तिकीट आरक्षण सुविधा तात्काळ सुरु करा या प्रमुख मागणीसह विविध मागण्या कड़े रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समिती सिंधुदुर्गच्या वतीने सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर आंदोलन करण्यात आले .
कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समिती सिंधुदुर्ग या संघटनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण, वैभववाडी, आचिर्ने, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी, मडूरा या सर्व दहा रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये न थांबणाऱ्या सर्व जलद गाड्यांना सिंधुदुर्ग स्थानकासह विविध रेल्वे स्थानकावर कायमस्वरूपी थांबा मिळावा. अशी मागणी मागील तीन वर्षापासून संघटनेमार्फत करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासन यांच्याशी अनेकवेळा संवाद साधण्यात आला, पत्रव्यवहार करण्यात आला. तरीही अद्याप संघटनेच्या मागणी नुसार जलद गाड्याना थांबा देण्यात आलेला नाही तसेच अन्य विविध मागण्या बाबत अद्याप ठोस असा निर्णय झालेला नाही. काही अपवाद वगळता रेल्वे स्थानकांची साफ सफाई, पाण्याची सुविधा, बैठक व्यवस्था अशी कामे गेल्या काही दिवसात करण्यात आलेली आहेत. मात्र प्रमुख मागणी असलेल्या जलद गाड्याना थांबा व तिकीट आरक्षण सुविधा या मागणीकड़े रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. याबाबत रेल्वे अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकित चर्चा झाली, रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सर्व रेल्वे स्थानकांची पाहणी केली, समस्या जानून घेतल्या परंतु अद्याप समस्या सुटलेल्या नाहीत किव्हा जलद गाड्याना थांबा देण्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही यासाठी आज रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने जन आंदोलन करण्यात आले.
यावेळी रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समितेचे अध्यक्ष प्रकाश पावसकर, सचिव अजय मयेकर, यांच्यासह पदाधिकारी परशुराम परब, नागेश ओरोस्कर, शुभम परब, नंदन वेंगुर्लेकर, राजन परब यांच्यासह जिल्हा भरातून पदाधिकारी व नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते, यावेळी विविध पदाधिकारी व मान्यवरांनी आपले विचार मांडताना शासन आणि रेल्वे प्रशासन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाश्यावर अन्याय करीत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. तसेच आमच्या मागण्यासाठी आतापर्यंत समन्वय आणि चर्चेतुन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. पण रेल्वे प्रशासनाला समन्वयाची भाषा समजत नसेल तर आता संघर्ष करावा लागेल, असा इशारा यावेळी बोलताना दिला.
२७ ऑगस्ट, २०२५ रोजी पासून कोकणातील सर्वात मोठा गणेशोत्सव साजरा होणार आहे. या सणासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना सर्व सुविधा मिळाव्यात, त्यांची गैरसोय होऊ नये तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाश्याना रेल्वे प्रवासाचा लाभ सुलभतेने घेता यावा त्यासाठी जास्तीत जास्त गाड्या या जिल्ह्यात थांबाव्यात, जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या सिंधुदुर्ग स्थानकावर सर्व जलद गाड्याना थांबा देऊन येथील शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यासह सर्वसामान्य प्रवाश्याची गेली कित्तेक वर्षे सुरु असलेली गैरसोय दूर करावी अशी माफक मागणी आहे . तरीही त्याकडे दुर्लक्ष होणार असेल आणि या आंदोलनाची दखल न घेतल्यास यापुढे तीव्र आंदोलन करून जिल्हाभर रेल्वे रोको आंदोलन होईल असा सूचक इशारा यावेळी संघटनेच्या पदधिकाऱ्यानी रेल्वे प्रशासनाला दिला.
पोलीस बंदोबस्त तैनात
रेल्वे प्रवासी समन्वय व् संघर्ष समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या जन आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
ही तर आंदोलनाची सुरुवात
सिंधुदुर्गातील जनता शांत आणि संयमी आहे. त्यामुळे आपल्या समस्या समंजस्याने व संयमाने सोडविण्यासाठी प्रयत्न करते,ही तर आंदोलनाची सुरुवात आहे, मात्र शांततेने प्रश्न सुटणारच नसतील तर आक्रमक होण्याचीही तयारी आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि शासनाने सिंधुदुर्गतील जनतेच्या संयमी वृत्तीचा अंत पाहू नये. – प्रकाश पावसकर, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समिती, सिंधुदुर्ग












