कणकवली उड्डाणपुलाखालील वाहने हटविण्याची कारवाई सुरू

आरटीओ, पोलीस आणि नगरपंचायतीकडून संयुक्त मोहीम

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील उड्डाणपुलाखाली बेकायदेशीरपणे लावण्यात आलेल्या वाहनांवर आज मोठी कारवाई करण्यात येत आहे. नगरपंचायत, पोलीस आणि परिवहन विभाग यांच्या संयुक्त पथकाने श्रीधर नाईक चौकापासून ही मोहीम सुरू केली.

एस.एम. हायस्कूल ते श्रीधर नाईक चौकापर्यंत असलेल्या उड्डाणपुलाखाली अवजड वाहनांपासून ते खासगी कार्यालये, हॉटेल्स, लॉज यांची वाहने बिनधास्तपणे पार्किंगसाठी ठेवली जात होती. पूर्वी ही जागा बॅरिकेट्सद्वारे बंद होती. मात्र, अलीकडे बॅरिकेट्स हटविल्यानंतर पार्किंग वाढले असून ही वाहने थेट महामार्गावर येत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता आणि अपघातांची शक्यता वाढली होती.

ही परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने कारवाईचा निर्णय घेतला. कारवाईदरम्यान कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच पोलीस बंदोबस्त तैनात आहे. नियमबाह्य पार्किंगमुळे नागरिक व वाहनचालक हैराण झाले होते. त्यामुळे या कारवाईचे शहरात स्वागत होत आहे.

error: Content is protected !!