कुडाळ तालुक्यातील विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध तपासणी शिबिर संपन्न

89 विद्यार्थ्यांनी घेतला शिबिराचा लाभ

​कुडाळ (प्रतिनिधी) : राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ला पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘अखिल भारतीय शिक्षा समागम (ABSS) 2025’ अंतर्गत कुडाळ तालुक्यात एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. पंचायत समिती, शिक्षण विभाग, कुडाळ आणि RBSK ग्रामीण रुग्णालय, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने 30 जुलै, 31जुलै, 05 ऑगस्ट व 6 ऑगस्ट 2025 रोजी विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय वाचा भाषा सुधार थेरपी, फिजिओथेरपी, दृष्टीदोष, अस्थिव्यंग आणि कान, नाक, घसा तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ​या शिबिराचा मुख्य उद्देश तालुक्यातील दृष्टीदोष, कर्णदोष, अस्थिव्यंग किंवा वाचदोष असलेल्या विद्यार्थ्यांची ओळख करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन व उपचार उपलब्ध करून देणे हा होता. या तपासणी शिबिरात RBSK च्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांची सखोल तपासणी केली. तसेच, शिक्षण विभागातील विशेष शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना शैक्षणिक मदत कशी करता येईल, याबाबत पालकांना मार्गदर्शन केले.

​या शिबिरामध्ये एकूण 89 विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. या तपासणीमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या अडचणी लवकर लक्षात आल्या आणि त्यांच्यासाठी विशेष शिक्षण पद्धतीची शिफारस करण्यात आली. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये समावेशक शिक्षणावर (Inclusive Education) विशेष भर देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरला. अशा शिबिरामुळे विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या यशस्वी उपक्रमाध्ये शिक्षण विभागाचे मा. गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर विशेष तज्ज्ञ अर्पिता परब, श्वेता जगताप, विशेष शिक्षक, ममता पारकर, रिया गुरव, जालिंदर कदम, मनीषा परब, नितीन गिड्डे इतर कर्मचारी उपस्थित होते तसेच RBSK ग्रामीण रुग्णालय टीम डॉ. मुग्धा दूधगावकर, डॉ. अमोल दूधगावकर, डॉ. मीनाक्षी गंगावणे, नेत्र तज्ज्ञ डॉ. सिद्धी सामंत डॉ.संतोष सावंत, कान नाक घसा तज्ञ, डॉ. श्याम राणे, अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. निखिल अवधूत आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!