जीवन आनंद संस्था व सर्विस सिव्हिल इंटरनॅशनल (SCI), महाराष्ट्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
खारेपाटण (प्रतिनिधी) : सर्विस सिव्हिल इंटरनॅशनल (SCI) आणि जीवन आनंद संस्थेच्या संयुक्त विद्यमाने संविता आश्रम, पणदूर येथे रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष उपक्रमात आश्रमातील बांधवांसाठी सुमधुर संगीत व मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आर्यानगरी रहिवासी मित्र मंडळी व स्वर क्षितिज वाद्यवृंदातर्फे संगीताचा कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जीवन आनंद संस्थेचे संस्थापक संदिप परब यांनी उपस्थितांना संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी संस्थेच्या कार्यात सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे मन:पूर्वक आभार मानले. या कार्यक्रमाला SCI संस्थेचे महाराष्ट्र प्रमुख नितीन वेंगुर्लेकर, उषा वेंगुर्लेकर, अश्विता चव्हाण, भारत पेंडुरकर, त्यांचे कुटुंबीय तसेच प्रशांत नलावडे, मैथिली नागवेकर, मीनल गवस, वीणा गवस, पुंडलिक गवस यांची प्रमुख उपस्थिती लाभली. संविता आश्रमाचे संदिप व भक्ती परब, आशिष व विजया कांबळी, शैलेन्द्र कदम, सचिन पडते, आरती वायंगणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

आश्रमाचे सर्व सेवा कार्यकर्ते व बांधवांनी संयोजनात विशेष मेहनत घेतली. आश्रमातील बांधवांनी आपली सारी दु:खे विसरून कार्यक्रमास सहभागी होवून आनंद घेतला. रक्षाबंधनाचा सण हा प्रेम, आपुलकी आणि बंधनांची भावना वृद्धिंगत करणारा असल्याने, या उपक्रमाने आश्रमातील वातावरण अधिकच आनंददायी व भावनिक बनले. उपस्थितांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.
दरम्यान एससीआयचे महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र कसबे आणि प्रतिनिधी हेमलता पवार यांनी जीवन आनंद संस्थेच्या विरारफाटा, ता.वसई, जि.पालघर येथील समर्थ आश्रमात बाधवांसह कार्यक्रमाचे आयोजन करून रक्षाबंधनचा आनंद साजरा केला.











