उपविभागीय कृषि अधिकारी उमाकांत पाटील
तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद

आचरा (प्रतिनिधी) : सकस, समतोल तसेच विषमुक्त आहार हा निरोगी जीवनासाठी आवश्यक असून रानभाज्यांमध्ये जीवनसत्त्वे व खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे या भाज्यांचा दैनंदिन आहारात समावेश होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन कणकवली उपविभागीय कृषि अधिकारी उमाकांत पाटील यांनी केले. मालवण तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव 2025 च्या उद्घाटनप्रसंगी आनंदव्हाळ येथे ते बोलत होते. महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा, महिला आर्थिक विकास महामंडळ (सिंधुकन्या कट्टा) व जय हनुमान मंदिर ट्रस्ट, आनंदव्हाळ यांच्या संयुक्त विद्यमाने सदर महोत्सव आयोजित करण्यात आला होता. उद्घाटन उमाकांत पाटील यांनी केले.
या प्रसंगी तालुका कृषि अधिकारी अमोल करंदीकर, जिल्हा समन्वयक अधिकारी नितीन काळे, मंडळ कृषि अधिकारी आचरा हुसेन आंबर्डेकर, मंडळ कृषि अधिकारी पोईप दशरथ सावंत, सरपंच आनंदव्हाळ रश्मी टेंबूलकर, सरपंच कातवड प्रतीक्षा हळदणकर, उपकृषी अधिकारी धनंजय गावडे, सिताराम परब, श्रीपाद चव्हाण, राणी थोरात, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा मालवण निलेश गोसावी, व्यवस्थापक सिंधुकन्या CMRC गीता चौकेकर, पाककला परीक्षक कविता तळेकर, रानभाजी तज्ञ मार्गदर्शक रामचंद्र शृंगारे तसेच कृषी विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुका कृषी अधिकारी अमोल करंदीकर यांनी रानभाज्या संवर्धनासाठी कृषी विभाग प्रयत्नशील असून शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. महोत्सवात रानभाज्यांची ओळख, त्यांचे आहारातील महत्त्व यावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच रानभाज्यांचे प्रदर्शन व पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रदर्शनात कोकणातील तब्बल 32 रानभाज्यांचे नमुने आकर्षक पद्धतीने मांडण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषि सेवक स्नेहा खोत यांनी केले तर आभार प्रदर्शन उपकृषी अधिकारी धनंजय गावडे यांनी केले.











