वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात सोमवारी झालेल्या जोरदार वादळी पावसाने वैभववाडी–उंबर्डे मार्गावर झाड कोसळल्याने सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली. तसेच कुंभवडे येथे एक घर कोसळून मोठे नुकसान झाले, तर वाभावे येथे एका घरावर झाड पडल्याने नुकसान झाले. सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.रविवारी सकाळी ८ ते सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत तालुक्यात ८० मिमी पावसाची नोंद झाली. सायंकाळी उशिरापर्यंत करूळ आणि भुईबावडा या दोन्ही घाटांवरील वाहतूक सुरळीत सुरू होती.
सोमवारी दुपारी तालुक्याला जोरदार वादळी पावसाने झोडपून काढले. या वादळी पावसाने दुपारी सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास वैभववाडी–उंबर्डे मार्गावर झाड रस्त्यावर कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. झाड वीजवाहिनीवर पडल्याने परिसरातील वीजपुरवठाही खंडित झाला. वाहनचालक व ग्रामस्थांनी झाड बाजूला करून एकेरी वाहतूक सुरु केली. त्यानंतर उर्वरित झाड संबंधित यंत्रणांनी तत्काळ झाड हटवून वाहतूक पूर्ववत केली. दरम्यान, वीज वितरण कंपनीकडून नुकसानग्रस्त वीजखांब उभारून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते.घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सूर्यकांत पाटील तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विनायक जोशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
कुंभवडे येथील हरिश्चंद्र राऊत यांचे घर मुसळधार पावसामुळे कोसळून मोठे नुकसान झाले. तसेच वाभावे येथील उमेश अनंत गावडे यांच्या घरावर झाड कोसळल्याने घराचे नुकसान झाले.
विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त..
ल्या काही दिवसांपासून वैभववाडी तालुक्यातील ग्रामीण भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. सततच्या लपंडावामुळे नागरिक आणि व्यावसायिक हैराण झाले असून, वीज वितरण कंपनीने तातडीने वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.










