रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० मध्ये वैभववाडीचा गौरव

रोटे. संजय रावराणे यांची सहाय्यक प्रांतपाल (असिस्टंट गव्हर्नर) पदी निवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० अंतर्गत रोटरी वर्ष २०२६–२७ साठी रोटे. संजय रावराणे यांची सहाय्यक प्रांतपाल (Assistant Governor) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे वैभववाडीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.
रोटे. संजय रावराणे हे रोटरी क्लब ऑफ वैभववाडीचे संस्थापक सदस्य व संस्थापक सचिव (Charter Member Secretary) असून, क्लबच्या स्थापनेपासून त्यांनी संघटन उभारणी, सदस्यवृद्धी आणि समाजोपयोगी सेवा प्रकल्प राबविण्यात मोलाचे योगदान दिले आहे. रोटरी वर्ष २०२३–२४ मध्ये क्लबचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उत्कृष्ट नेतृत्व करत विविध लोकोपयोगी उपक्रम यशस्वीपणे राबविले.

त्यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली रोटरी क्लब ऑफ वैभववाडीने रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० मधील “सर्वोत्कृष्ट रोटरी क्लब (Best Club)” हा मानाचा पुरस्कार प्राप्त केला. त्याच वर्षी त्यांना “सर्वोत्कृष्ट अध्यक्ष (Best President)” हा जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर त्यांच्या नेतृत्वाखाली क्लबच्या सचिवाला “सर्वोत्कृष्ट सचिव (Best Secretary)” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर रोटरी वर्ष २०२४–२५ मध्ये त्यांच्या सातत्यपूर्ण, प्रभावी आणि सेवाभावी कार्याची दखल घेत त्यांना “सर्वोत्कृष्ट रोटेरियन (Best Rotarian)” हा प्रतिष्ठेचा सन्मान बहाल करण्यात आला.
रोटरीबरोबरच शिक्षण, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. सन १९९२ पासून ते आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडी येथे कार्यालय अधीक्षक म्हणून कार्यरत असून, त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी मुंबई विद्यापीठाने २०१८–१९ या वर्षाचा “सर्वोत्कृष्ट कर्मचारी” पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे.

ते महाराष्ट्र राज्य शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना (कोकण विभाग) चे सचिव, वैभववाडी ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचे उपाध्यक्ष तसेच वैभववाडी तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक म्हणूनही विविध क्षेत्रात सक्रिय योगदान देत आहेत.रोटरी वर्ष २०२६–२७ साठी रोटरी इंटरनॅशनलने जाहीर केलेल्या “Create Lasting Impact” या ब्रीदवाक्यानुसार समाजावर चिरंतन प्रभाव निर्माण करणारे सेवा प्रकल्प, सदस्यवृद्धी, रोटरी फाउंडेशनसाठी योगदान आणि शाश्वत समाजसेवा यांवर विशेष भर देण्याचा त्यांचा मानस आहे.रोटे. संजय रावराणे यांच्या या निवडीबद्दल रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० मधील विविध क्लब, सामाजिक संस्था, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तसेच वैभववाडी तालुक्यातील नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे रोटरीची सेवा अधिक व्यापक, प्रभावी आणि समाजाभिमुख होईल, असा विश्वास सर्व स्तरातून व्यक्त केला जात आहे.

error: Content is protected !!