वैभववाडीत मुसळधार पाऊस; भुईबावडा घाटात दरड काेसळली, वाहतूक ठप्प

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात गेले तीन चार दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाने शनिवारी रात्री भुईबावडा घाटात दरड कोसळून दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. तर रविवारी सकाळी हेत येथे अरुणा धरणाच्या कालव्याचे भराव अरुणा नदीवरील पुलावर मातीचा भराव आल्यामुळे हेत मौदे मार्गांवरील वाहतूक सकाळी काही वेळ ठप्प झाली होती. गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात १२४ मी मी पावसाची नोंद झाली आहे.

शनिवारी रात्री ९. ३० वाजण्याच्या सुमारास भुईबावडा घाटात दरड पडल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. घाटात दोन्हीही बाजूला वाहने अडकून पडली होती. याबाबत माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने जेसिबीच्या साहाय्याने दरड हाताविण्यास सुरुवात केली माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, पो. कॉ. हरीश जायभाय घटना स्थळी दाखल झाले होते. त्यांनी वाहतूक सुरळीत करण्याबाबत सूचना केल्या. दीड दोन तासात वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान शनिवारी सकाळी तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी भुईबावडा व करूळ घाटाची पाहणी केली. तर रविवारी दुपारी भुईबवाडा घाटातील संपूर्ण दरड हटविण्यात आली. यावेळी सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता श्री जोशी उपस्थित होते.

तर रविवारी सकाळी अरुणा धरणाचा धरणाच्या भिंती लागतचा कालवाच्या बाजूची माती आल्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. पाटबंधारे विभागाने जेसिबीच्या साहाय्याने पुलावर आलेली माती बाजूला करून वाहतूक सुरु केली आहे.

रविवारी सायंकाळ पासून पावसाचा जोर ओसरला होता. सायंकाळी उशिरापर्यंत तालुक्यातील कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची नोंद झाली नव्हती.

error: Content is protected !!