अमोल टेंबकर; अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अभ्यास वर्गात मार्गदर्शन…
सावंतवाडी (प्रतिनिधी) : आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाकडे केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून न पाहता, त्याकडे रोजगाराची एक उत्तम संधी म्हणून पाहिले पाहिजे. इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप यांसारख्या लोकप्रिय माध्यमांचा योग्य वापर करून, रिल्स आणि जाहिरातींच्या माध्यमातून तरुण घरबसल्या हजारो रुपयांचे अर्थार्जन करू शकतात. सोशल मीडिया हे प्रगतीचे एक अतिशय प्रभावी माध्यम असून तरुण पिढीने याचा वापर अत्यंत सकारात्मक, योग्य आणि जबाबदारीने केला पाहिजे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष पत्रकार अमोल टेंबकर यांनी आज येथे केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने येथील कळसुलकर हायस्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा अभ्यास वर्गामध्ये उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी कोंकण प्रांत सह मंत्री यश कंटक, रत्नागिरी विभाग संघटन मंत्री ओजस जयवंत, जिल्हा संयोजक मयूर तर्पे आदी उपस्थित होते. यावेळी श्री टेंबकर यांनी सोशल मीडियाच्या दोन्ही बाजू स्पष्ट केल्या. हे माध्यम जेवढे चांगले आहे, तेवढेच त्याचे दुष्परिणामही गंभीर आहेत. जर योग्य काळजी घेतली नाही, तर सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे तरुण भरकटण्याची शक्यता नाकारता येत नाही, ज्याचा फटका बसून आयुष्यात अनेक चढ-उतार निर्माण होऊ शकतात. म्हणूनच तरुणांनी या माध्यमाच्या आहारी न जाता, यातील आधुनिक तंत्रज्ञान समजून घेऊन ते स्वतःच्या आर्थिक प्रगतीसाठी वापरले पाहिजे. डिजिटल क्षेत्रातील पत्रकारितेवर प्रकाश टाकताना अमोल टेंबकर यांनी सांगितले की, आजच्या काळात पत्रकारिता क्षेत्रात करिअरच्या आणि रोजगाराच्या अनेक नव्या वाटा खुल्या झाल्या आहेत. युवकांनी या सुवर्णसंधींचा फायदा घेऊन स्वावलंबी होण्याच्या उद्देशाने या क्षेत्राकडे पाहावे, असे आवाहन त्यांनी केले. या अभ्यास वर्गाला मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुसंख्य विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोशल मीडिया हे रोजगाराची संधी देणारे प्रभावी माध्यम…











