झोपेत असतानाच घरावर कोसळले भलेमोठे झाड ; ग्रामस्थांच्या तत्पर मदतीमुळे मोठा अनर्थ टळला
कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच कलमठ गावडेवाडी येथील हितेश हरमलकर यांच्या कुटुंबावर रविवारी पहाटे मोठे संकट कोसळले. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घरातील सर्व सदस्य गाढ झोपेत असताना घरालगतचे एक भलेमोठे जुनाट झाड थेट त्यांच्या घराच्या छपरावर कोसळले. या दुर्घटनेत घराचे वासे, कौले व छपराचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने आणि दैव बलवत्तर असल्याने घरातील सदस्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच शेजारील परिसरातील नागरिक आणि ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. संकटात सापडलेल्या हरमलकर कुटुंबाला धीर देत ग्रामस्थांनी एकजुटीने छपरावर कोसळलेले मोठे झाड हटविण्याचे काम हाती घेतले. ग्रामस्थांच्या या तातडीच्या मदतीमुळे हरमलकर कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला.
दरम्यान, भाजप पदाधिकारी तथा कलमठचे माजी उपसरपंच स्वप्निल चिंदरकर यांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेत या दुर्घटनेची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाला दिली. त्यानंतर कलमठचे सरपंच संदीप मेस्री, पंचायत समिती सदस्य गुरु वर्देकर, ग्रामपंचायत सदस्या प्रियाली आचरेकर तसेच कलमठच्या तलाठी सौ. कडूलकर यांनी घटनास्थळी भेट देत नुकसानीची पाहणी केली व पंचनामा केला. प्रशासनाच्या वतीने हरमलकर कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
मुसळधार पावसाच्या तडाख्यात अचानक आलेल्या या संकटामुळे हरमलकर कुटुंब हादरून गेले असले, तरी ग्रामस्थांनी दाखविलेली माणुसकी, लोकप्रतिनिधींची तत्परता आणि प्रशासनाची त्वरित दखल यामुळे संकटाच्या क्षणी गावाने हरमलकर कुटुंबाला आधार दिल्याचे चित्र पाहायला मिळाले.












