कोल्हापूर (प्रतिनिधी) : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर वन विभागाच्या हद्दीतील सवतकडा धबधबा (ता. भुदरगड), बर्की धबधबा (ता. शाहूवाडी), रामतिर्थ धबधबा (ता. आजरा), तिलारी परिसरातील धबधबे (ता. चंदगड) तसेच मसाई पठार येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देताहेत. या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी स्वतःची व कुटुंबीयांची सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन कोल्हापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील यांनी केले आहे.
वन विभागाने पर्यटकांना धबधब्याच्या खोल पाण्यात जाणे, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे आणि निसरड्या कड्यांवर किंवा दगडांवर चढ-उतार करणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. लहान मुलांवर सतत लक्ष ठेवावे, मद्यपान करून पर्यटनस्थळी किंवा पाण्यात उतरू नये, तसेच वन विभाग, पोलीस व स्थानिक प्रशासनाच्या सूचना व सुरक्षा फलकांचे पालन करावे.
त्याचबरोबर परिसरात प्लास्टिक, काच बाटल्या किंवा इतर कचरा टाकू नये, वन्यजीवांना त्रास होईल असे वर्तन करू नये आणि मोठ्या आवाजात संगीत वाजवणे टाळावे. अतिवृष्टी, पाण्याची पातळी वाढणे किंवा प्रतिकूल हवामान असल्यास धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.
कोणतीही आपत्कालीन परिस्थिती, अपघात किंवा मदतीची आवश्यकता भासल्यास वन विभागाच्या टोल-फ्री क्रमांक 1926 वर अथवा संबंधित तालुक्यातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांशीही संपर्क साधावा.
अविनाश तायनाक, वनपरिक्षेत्र अधिकारी गारगोटी- 9422701221, किशारे आहेर, वनपरिक्षेत्र अधिकारीपेंडाखळे-शाहुवाडी- 8652496253, सचिन सावंत, वनपरिक्षेत्र अधिकारी आजरा- 9049501314, शीतल पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी पाटणे-चंदगड- 9422974038,अजित माळी, वनपरिक्षेत्र अधिकारी पन्हाळा- 9405291523 यांच्याशी संपर्क साधावा.










