प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयातील ग्रामीण विकास विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले,याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त डॉ. राजश्री साळुंखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी कणकवली महाविद्यालयात सुमारे ३४ वर्ष प्राध्यापक म्हणून सेवा बजावली. ग्रामीण विकास या विषयाचे ते प्राध्यापक होते. अप्पासाहेब पटवर्धन यांच्या कार्यावर त्यांनी पीएच.डी.चे संशोधन केले असून गेली अनेक वर्षे ते गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.एक विद्यार्थी प्रिय व अभ्यासू प्राध्यापक म्हणून त्यांची विशेष ओळख होती.

कणकवली महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, जिमखाना विभाग, परीक्षा विभाग, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग अशा विविध विभागात त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने आपल्या कामाचा ठसा उमटवला. तसेच मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग सल्लागार समिती, महिला विकास कक्ष सल्लागार समिती, विद्यार्थी विकास कक्ष सल्लागार समिती, मुंबई विद्यापीठ ग्रामीण विकास अभ्यास मंडळ, मुंबई विद्यापीठ आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग क्षेत्र समन्वयक या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या सांभाळल्या आहेत. मुंबई विद्यापीठाने राष्ट्रीय सेवा योजनेतील कामाचा जिल्हास्तरीय ‘आदर्श कार्यक्रमाधिकारी’ पुरस्कार देऊन 2007 साली विशेष सन्मान केला होता. या निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी माननीय डॉ. राजश्री साळुंखे उपस्थित होत्या. तर मंचावर प्र. प्राचार्य युवराज महालिंगे, पर्यवेक्षक महादेव माने, विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक पी. जे.कांबळे, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ. सोमनाथ कदम, कार्यालय अधीक्षक संजय ठाकूर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय डॉ. राजश्री साळुंखे यांनी प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांच्या कार्याचा गौरव केला. “डॉ. राजेंद्र मुंबरकर यांच्यासारखे आदर्श आणि सेवाभावी शिक्षक संस्थेलाच नव्हे तर समाजाला सुद्धा हवेहवेसे असतात. काळाच्या प्रवाहानुसार प्राध्यापकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपल्या अध्ययन अध्यापनामध्ये करायला हवा. आपल्या सहकाऱ्यातील चांगले गुण आणि कौशल्य आत्मसात करायला हवे” असे प्रतिपादन प्रा.डॉ. राजश्री साळुंखे यांनी यावेळी केले. अत्यंत सामान्य परिस्थितीतून शिक्षण घेऊन उच्च पदापर्यंत पोहोचता येते’ हा आदर्श डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून घेतला आणि प्रामाणिक व निष्ठेने अध्ययन अध्यापन आणि सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न केला. सेवा काळातील सर्वांचे ऋण कधीही विसरता येणार नाही. कै. केशवराव राणे यांनी ग्रामीण भागात शिक्षणाची संधी निर्माण केल्यामुळे मला प्राध्यापक पदी संधी मिळाली असे भावोद्गार डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी यावेळी काढले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ लिपिक मंगेश आरेकर यांनी केले व उपस्थितांचे आभार प्रा.विजयकुमार सावंत यांनी मानले. यावेळी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!