ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होण्याची शक्यता वाढली असून अतिसार, कॉलरा, टायफॉईड, कावीळ आणि गॅस्ट्रोएन्टरायटिससारख्या जलजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता जपण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी आणि शक्यतो पाणी उकळून किंवा निर्जंतुक करूनच वापरावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्यात विहिरी, बोअरवेल, नळपाणी योजना आणि इतर जलस्रोतांमध्ये बाहेरील दूषित पाणी मिसळण्याची शक्यता असते. त्यामुळे पिण्याचे पाणी किमान १० ते १५ मिनिटे उकळून वापरणे किंवा द्रवरूप क्लोरीन (मेडिक्लोर) अथवा क्लोरीन गोळ्यांचा योग्य प्रमाणात वापर करून पाणी निर्जंतुक करणे आवश्यक आहे.घरातील पाणी साठविण्याच्या टाक्या, ड्रम व भांडी नियमित स्वच्छ करून ती नेहमी झाकून ठेवावीत. पाणी काढण्यासाठी स्वच्छ ओगराळ्याचा वापर करावा. हात थेट पाण्यात बुडवणे टाळावे. तसेच पाण्याला दुर्गंधी येत असल्यास, रंग बदलल्यास किंवा पाणी गढूळ दिसत असल्यास ते पाणी पिण्यासाठी वापरू नये. आवश्यक असल्यास पाणी गाळून वापरण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.
गावांमधील विहिरी, नळपाणी योजना आणि इतर जलस्रोतांच्या परिसरात स्वच्छता राखणे, सांडपाणी किंवा कचरा साचू न देणे आणि दूषित पाण्याचा संपर्क टाळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.जलजन्य आजार टाळण्यासाठी सुरक्षित स्रोताचे पाणीच वापरणे, जेवणापूर्वी आणि शौचानंतर साबणाने हात धुणे, उघड्यावर विक्री होणारे अन्नपदार्थ व दूषित पाणी टाळणे तसेच शक्य असल्यास चांगल्या दर्जाच्या वॉटर प्युरिफायरचा वापर करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अतिसार, उलट्या, ताप, पोटदुखी किंवा कावीळ यांसारखी लक्षणे आढळल्यास स्वउपचार न करता तातडीने जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात जाऊन वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
“स्वच्छ पाणी – निरोगी जीवनाची हमी” हा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवून पावसाळ्यात सुरक्षित पाण्याचा वापर करण्याची सवय अंगीकारावी, असे आवाहनही आरोग्य विभागाने केले आहे.











