तुळसुली लिंगेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी अथर्व कालेलकर शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात सहावा

नवोदय परीक्षेतही जिल्ह्यात दुसरा व राज्यात सातवा क्रमांक मिळवणाऱ्या अथर्वचे दुहेरी यश

कुडाळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२६’ (इयत्ता पाचवी) चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये लिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तुळसुली येथील प्रतिभावान विद्यार्थी कु. अथर्व हरिश्चंद्र कालेलकर याने ग्रामीण सर्वसाधारण गटातून जिल्ह्यात सहावा (६ वा) क्रमांक पटकावून शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे, अथर्वने यापूर्वी नवोदय विद्यालय निवड परीक्षेतही आपले अव्वल स्थान सिद्ध करत जिल्ह्यात दुसरा व राज्यात सातवा क्रमांक संपादित केला होता. त्यानंतर आता शिष्यवृत्ती परीक्षेतही जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवून त्याने आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे.

अथर्वच्या या दैदिप्यमान यशामागे विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील भाटिवडेकर सर यांचे खंबीर नेतृत्व, तसेच मार्गदर्शक शिक्षक विलास राठोड, स्वरूप यादव, गावडे सर, लक्ष्मण आगलावे सर आणि सहदेव घाडी सर यांचे बहुमोल मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. अथर्व हा तुळसुली चव्हाटा शाळेतील प्राथमिक शिक्षक हरिश्चंद्र कालेलकर आणि सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग आंबडपाल येथील कालवा निरीक्षक स्नेहल कालेलकर यांचा मुलगा आहे. अथर्वने मिळवलेल्या या दुहेरी आणि ऐतिहासिक यशामुळे तुळसुली गावासह संपूर्ण कुडाळ परिसरातून व शैक्षणिक वर्तुळातून त्याचे अभिनंदन होत आहे. कौतुकाचा प्रचंड वर्षाव होत आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, संस्थाचालक आणि ग्रामस्थांनी त्याचे मन:पूर्वक अभिनंदन करून पुढील उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!