जसवंत नायक या संविता आश्रमातील बांधवांच्या हस्ते ध्वजारोहण.
खारेपाटण (प्रतिनिधी) : जीवन आनंद संस्थेच्या पणदूर येथील संविता आश्रम येथे १५ ऑगस्ट दिनी ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संविता आश्रमातील बांधव जसवंत नायक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मागील पाच वर्षांपासून आश्रमाच्या सेवेत सहभागी असलेले जसवंत नायक यांनी मानसिक आजारातून बरे झाल्यानंतर संस्थेच्या शेती प्रकल्पासह इतर सेवांमध्ये मोलाचे योगदान दिले आहे, देत आहेत.
संस्थापक संदिप परब यांनी यावेळी जसवंत यांचे विशेष कौतुक केले व सर्व बांधव आणि कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना त्यांनी आदरांजली अर्पण केली व आज देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांचे आभार मानले. कार्यक्रमात संस्थेच्या सामाजिक उपक्रमांची माहिती देण्यात आली. परब यांनी संस्थेच्या सेवाभावी कार्यात योगदान देणाऱ्या सर्व कर्मचारी आणि बांधवांचे मन:पूर्वक आभार मानले. संपूर्ण कार्यक्रम उत्साही व देशभक्तिपर वातावरणात पार पडला.











