दुचाकी-ट्रक भीषण अपघातात दोन युवक ठार

कणकवली (प्रतिनिधी) : नांदगावहून हुंबरटला जात असलेल्या दुचाकीचा महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी रात्री सुमारे १०.३० वाजता बेळणे येथे घडली. या अपघातात जैद मीर (१८) आणि शाहीद शेख (२०, दोघेही रा. हुंबरट मुस्लिमवाडी) हे दुर्दैवी मृत्यूमुखी पडले. त्यांच्या निधनाने हुंबरट परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही युवक चायनीज खाद्यपदार्थ आणण्यासाठी होंडा शाइन दुचाकीवरून नांदगाव येथे गेले होते. परतताना बेळणे गावाजवळ महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला त्यांची दुचाकी धडकली. धडक एवढी भीषण होती की दुचाकीचा पुढील भाग पूर्णतः चक्काचूर झाला, तर दोन्ही युवकांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

महामार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी तत्काळ जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केली असता ते दोघेही मृत अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले. अपघाताची खबर समजताच हुंबरट परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने रुग्णालयात धाव घेतली. कणकवली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून, मृतांच्या नातेवाईकांचे जबाब घेऊन अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

error: Content is protected !!