वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यात गेले पाच-सहा दिवस पावसाची संतत धार सुरु आहे. रविवारी पासून तर अक्षरशः मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील नदया,नाले दुथडी भरून वाहत आहेत. तर अनेक कॉजवे पाण्याखाली गेली आहेत. करूळ, भुईबावडा घाटात किरकोळ पडझड सुरू आहे. मात्र दोन्ही घाटातून सायंकाळी उशिरापर्यंत धीम्या गतीने वाहतूक सुरू होती. तर आचिर्णे येथे घराची भिंत पडून नुकसान झाले आहे. तर कोळपे येथे रस्तावर झाड पडल्यामुळे खारेपाटण गगनबावडा राज्यमार्गांवरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. मुसळधार पावसाने पावसामुळे आचिर्णे घाणेगाडी वाडी येथील जयप्रकाश नरसिंह रावराणे यांच्या घराची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले आहे. तर कोळपे मानेवाडी येथे खारेपाठण – गगनबावडा राज्य मार्गावर झाड पडल्यामुळे खारेपाटन गगनबावडा वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. स्थानिक ग्रामस्थांनी झाड तोडून रस्ता मोकळा करून वाहतूक सुरळीत केली आहे. त्याचप्रमाणे वैभववाडी शिराळे मार्गावर सडूरे दौंडोबा येथे दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे पाच ते सहा तास बंद झाली होती. प्रशासनामार्फत जेसीबी च्या साहाय्याने दरड हटवून रस्ता मोकळा केला आहे. तालुक्यातील महत्वाचे असलेले करूळ व भुईबावडा या दोन्हीही घाटात किरकोळ पडझड सुरु होती. मात्र दोन्हीही घाटातून सायंकाळी उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत सुरु होती.












