वैभववाडी शहरातील राजरोसपणे सुरू असलेले मटका व अन्य अवैध धंदे तात्काळ बंद करा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पोलीस निरीक्षकांना निवेदन

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी बाजारपेठेत राजरोसपणे मटका व इतर अवैध धंदे सुरू आहेत. याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. तरुण पिढी बरबाद करणारे हे धंदे तात्काळ बंद करावेत. अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धंद्याची पोलखोल करण्याचा इशारा निवेदनाद्वारे पोलीस निरीक्षक वैभववाडी यांना देण्यात आला आहे.

वैभववाडी शहरांमध्ये गेले अनेक महिने स्टॉल लावून राजरोसपणे मटका सुरू आहे. परंतु अवैध धंदे बंद करण्यासाठी आपले पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. या बेकायदेशीर धंद्याबाबत वेळोवेळी आपल्याकडे लेखी तक्रार देऊन सुद्धा त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. कालच जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः कणकवली येथे मटका व जुगार धंद्याची पोलखोल केले आहे. परंतु त्यांनी केलेली पोलखोल ही काही दिवसांपूर्वी मर्यादित न ठेवता अशा प्रकारचे बेकायदेशीर धंदे कायमस्वरूपी बंद झाले पाहिजे व वेळोवेळी आपल्याकडून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. तरच या धंद्यांना आळा बसू शकतो. या बेकायदेशीर धंद्यामुळे तालुक्यातील युवा पिढी व कुटुंबाच्या कुटुंबे बरबाद होत चाललेली आहेत. याला जबाबदार कोण असा सवाल केला आहे.

आपल्या पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर शासकीय गोडाऊन परिसरात अनेक ठिकाणी स्टॉल तयार करून राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहेत. तरी हे सर्व अवैध धंदे आपल्या खात्यामार्फत तात्काळ बंद करावेत अन्यथा शिवसेना पक्षाच्या वतीने या धंदयाची पोलखोल आपल्या समक्ष करण्यात येईल, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी दिला आहे.

यावेळी उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, गुलजार काझी, महिला आघाडी नलिनी पाटील, युवासेना तालुकाप्रमुख रोहित पावसकर, तालुका संघटक – दिव्या पाचकुडे, माजी सभापती- लक्ष्मण रावराणे, विभाग प्रमुख जितेंद्र तळेकर, विलास पावसकर, सुर्यकांत परब, यशवंत गवाणकर, अमित कुडतरकर, विठोबा गुरव, दिपक पवार आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!