तळेरे (प्रतिनिधी) : पीएम श्री जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तळेरे क्र. १ येथे आज शनिवार दि. २३ ऑगस्ट, २०२५ रोजी “आनंददायी शनिवार” या उपाक्रमाच्या अंतर्गत “भाकरी डे” उत्साहात साजरा करण्यात आला. परंपरागत पद्धतीने दगडाच्या चुली मांडून ज्वारी, बाजरी, नाचणी व तांदळाच्या भाकऱ्या पालक व शिक्षकांनी तयार केल्या.
या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक, विद्यार्थी, स्वयंपाकी, मदतनीस तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य सहभागी झाले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भाकरी बनविण्याची पद्धत दाखवून देण्यात आली. त्याचबरोबर आहारातील भाकरीचे महत्व व उपयुक्तता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश जाधव यांनी स्वतः रचलेले “कष्टाची भाकरी” हे काव्य सादर केले. या काव्यामुळे कार्यक्रमाला एक आगळावेगळा रंग प्राप्त झाला. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनीही उत्साहाने या उपक्रमाचा आनंद घेतला.










