मात्र रस्ते, वीज पुरवठा, वीज दरवाढ याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
दर्शनास येणाऱ्या नेत्यांना प्रत्येकाने धाडसाने विचारावे- जनसामान्यांकडून आवाहन
फोंडाघाट (प्रतिनिधी) : कोकणवासीयांचे आराध्य गणेशोत्सव दोन दिवसावर आला असताना, मुंबई आणि परगावातील चाकरमानी, माहेरवाशिनी कुटुंबासमवेत गावी येऊ लागले आहेत. त्यामुळे रेल्वे स्टेशन, एसटी स्थानके गजबजू लागले आहेत. बाजारपेठेतील किराणा- स्टेशनरी- ज्वेलरी- आरास साहित्य- कापड दुकानांमधून विविधतेचा मनपसंद माल दुकानी सजविण्यात आला आहे. कोकणवासी- व्यापारी मात्र ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहे. वाडी- वाडी वरील गणेश मूर्ती कलाकार आपल्या विविध आकाराच्या आणि ऑर्डरच्या मूर्ती अधिक सुबक, मनमोहन करून आपल्या रंगकाम शाळाचे महत्त्व अधोरेखित करण्यात मग्न आहेत. मूर्तीकाम, रंगकाम अंतिम टप्प्यात आले असून, मूर्तीच्या डोळ्यांची जिवंत लिखाइचे काम, सोनेरीचे काम रात्रंदिन सुरू आहे. पंढरपूरवरून ढोलकी- तबल्याच्या कारागिरांची कामेसुद्धा पूर्णत्वाकडे आहेत. त्यामुळे भजनीबुवांची आपल्या तालबद्ध वाद्यांच्या निवडीसाठी लगबग दिसून येते. एकंदरीत विविध आकर्षक सजावटीने फोंडा बाजारपेठ सजली आहे.
पंधरा दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसाने, गेले तीन दिवस उसंत घेतल्यामुळे, भाविक, नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये उत्साह दिसत आहे. मात्र या उत्साहाला बाजारात भाववाढीचा मोठा फटका बसल्याचे चित्र! त्यातच कोकणी माणूस प्रसंगी ऋण काढून सण साजरा करणारा! त्यातही तडजोड करण्यात वाकबगार! त्यामुळे प्रत्येक दुकानात गर्दी असली तरी प्रचंड दरवाढीमुळे खरेदी फक्त २५ टक्केवर आली असून, शास्त्र पूर्ण करण्याकडे प्रत्येकाचा कल दिसून येत आहे. प्रत्येक वस्तूचे दर गगनाला भिडले आहेत. नारळ पन्नास रुपये, माटवीचे साहित्य एकत्रित पंधराशे रुपये, कडधान्याचे दर अडीच पटीने तर सिलेंडर तीन पटीने वाढलेत. त्यातही सीजन असल्याने प्रत्येक जण आपल्या वस्तूचे – प्रवासाचे दर पटीने वाढवत आहेत. यावर प्रशासनाचा वचक नसल्याने त्याचा फटका गोरगरीब सर्वसामान्य ग्राहकाला बसत आहे.

त्यातच घाटापासून नांदगाव रस्त्यापर्यंत खड्ड्याचे साम्राज्य असून त्याकडेही अधिकाऱ्यांचे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे, पाऊस कमी झाल्यानंतरही अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे वाहनधारक- कोकणवासी- ग्रामस्थ तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. यामुळे गंभीर अपघात होऊन जीवितहानीची भीती बोलून दाखवली जात आहे. त्यामुळे या खड्ड्यात अपघात झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभागावर राहील, असा इशारा देण्यात आला आहे.
वसुलीसाठी सदैव दक्ष राहणाऱ्या वीज मंडळाचे अधिकारी, होणाऱ्या वीज खंडित प्रकाराकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यात दिवसातून किमान दहा ते पंधरा वेळा वीज खंडित होते. त्यामुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या सजावटीवर, पंचक्रोशीतील पाणीपुरवठा योजनेवर, लघु उद्योगावर परिणाम होत आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात वीज खंडित झाल्यास चाकरमानी – ग्रामस्थ – व्यापारी यांच्यात प्रक्षोभ होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे उद्भवणाऱ्या प्रसंगाला वीज मंडळ व अधिकारी जबाबदार राहतील, असे सूचित करण्यात आले आहे.
भाजी- फळ विक्रेते आपल्या दुकानाची आकर्षक मांडणी करून ग्राहकांना आकृष्ट करीत आहेत. मात्र भाव ऐकून ग्राहक काहीसे बिथरले जात असून, त्यामुळे व्यापारी व्यतिथ आहेत. मात्र फटाक्यांच्या आतिशबाजी, सवाद्य आणि बाप्पा मोरयाच्या गजरात वातावरण अजून भक्तीमय होत आहे. प्रचंड उत्साहात मोदक पक्वान्नांचा नैवेद्य, आरती, भजनांच्या रात्रपाळीत यापुढील गणेशोत्सव मनोभावे अकरा दिवस नातेवाईक, मित्रपरिवाराच्या सानिध्यात गजबजणार आहे.










