फोंडाघाट महाविद्यालयात ‘यश तुमच्या हाती’ या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान संपन्न

विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, परिश्रम व योग्य नियोजनातून यश मिळवावे – एस. बी. पाटील यांचे प्रतिपादन

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथे स्पर्धा परीक्षा विभागाच्या वतीने ‘यश तुमच्या हाती’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान नुकतेच संपन्न झाले. वैभववाडी येथील प्रख्यात मार्गदर्शक एस. बी. पाटील हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी व्याख्याते एस. बी. पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्पर्धा परीक्षा विभागप्रमुख डॉ. सतीश कामत यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांचा गांभीर्याने अभ्यास करून स्वतःची दिशा निश्चित करण्यासाठी अशा मार्गदर्शन सत्रांचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते एस. बी. पाटील यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये, योग्य अभ्यास पद्धती, वेळेचे नियोजन व सातत्य यांचे महत्त्व पटवून सांगितले. यशस्वी होण्यासाठी केवळ मेहनत पुरेशी नाही तर ती योग्य दिशेने व नियोजनपूर्वक असली पाहिजे, असे ते म्हणाले. त्यांनी स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असलेल्या अनेक पुस्तकांची उदाहरणे दिली. तसेच यशस्वी झालेल्या नामवंत व्यक्तींची प्रेरणादायी उदाहरणे देत विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे आवाहन केले.

अध्यक्षस्थानावरून प्राचार्य डॉ. पुरंदर नारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, यश ही कुठलीही जादूची कांडी नसून सततचा प्रयत्न, सातत्याने घेतलेली मेहनत आणि प्रामाणिकपणा या गुणांमधूनच ते प्राप्त होते. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी पहिली अट म्हणजे स्पष्ट ध्येय निश्चित करणे. ध्येय निश्चित झाले की त्यासाठी पूर्ण ताकदीने झटले पाहिजे. विद्यार्थ्यांनी केवळ स्पर्धा परीक्षांसाठीच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर यशस्वी होण्यासाठी जिद्द, कष्ट, वेळेचे शिस्तबद्ध नियोजन आणि आत्मविश्वास या गुणांचा स्वीकार करणे गरजेचे आहे. अनेकदा अपयश आल्यावर विद्यार्थी खचतात; पण अपयश हीच खरी यशाची पायरी आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांनी अपयशातून शिकून पुढे पावले टाकली, त्यांनाच यशशिखर गाठता आले आहे. स्पर्धा परीक्षा विभागाने असे कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना योग्य दिशादर्शन दिल्याचे समाधान असल्याचेही त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनातून प्रेरणा घेऊन मोठ्या उद्दिष्टांच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. बाजीराव डाफळे यांनी उपस्थितांचे आभार मानून व्याख्यानाचा समारोप केला. या मार्गदर्शन व्याख्यानाला महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!