खारेपाटण (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील कोर्ले या गावच्या म.गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी गावचे माजी उपसरपंच व सामजिक कार्यकर्ते सचिन कृष्ण कोर्लेकर यांची नुकतीच सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
कोर्ले, ता.देवगड या गावाच्या ग्रामपंचायतीची सर्वसाधारण ग्रामसभा नुकतीच सरपंच विश्वनाथ खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाली. यावेळी सर्वानुमते कोर्ले गावच्या म.गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सचिन कोर्लेकर यांची निवड करण्यात आली. यावेळी उपसरपंच सुनील कांबळे, विजय मघाम, पोलिस पाटील सुरेश शृंगारे, शालिनी कोर्लेकर, धोंडीराम कांबळे, सुरेश जावडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सचिन कोर्लेकर हे बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या संघटनेचे सचिव म्हणून कार्यरत असून युनिक अकॅडमी मार्फत स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून जिल्ह्यात अधिकारी घडविण्याचे काम करीत आहेत. ग्रामस्थांनी माझ्यावर विश्वास दाखवून दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून तंटामुक्त समितीच्या माध्यमातून सर्वांना सोबत घेऊन गावात कायदा सुव्यवस्था चोख व अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी नवनिर्वाचित तंटामुक्त समिती अध्यक्ष सचिन कोर्लेकर यांनी सांगितले.










