वैभववाडी (प्रतिनिधी) : गणेश चतुर्थीच्या पूर्वसंधेला वैभववाडी बाजारपेठेत ग्राहकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. तर चाकरमाण्यांचा गावाकडे येण्याचा ओघ सुरूच असून एसटी बस, खाजगी बस, रेल्वे, खाजगी वाहने असे मिळेल त्या वाहनांनी गावाकडे धाव घेत आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन, बस स्थानक, रिक्षा स्टॅन्ड सगळीकडे चाकरमानी दिसत आहेत. मात्र सकाळी पावसाची रीप-रीप सुरु झाल्यामुळे गणेश भक्तांची तारांबळ उडाल्याचे चित्र सगळीकडे दिसत होते.
तालुक्यातील वैभववाडी बाजारपेठही प्रमुख बाजारपेठ असून त्यानंतर भुईबावडा, उंबर्डे बाजारपेठ आहेत. या सर्वच ठिकाणी ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. वैभववाडीचा बुधवारी आठवडा बाजार असतो. मात्र यावर्षी बुधवारी गणेश चतुर्थी असल्यामुळे बुधवारचा आठवडे बाजार वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेने मंगळवारी भरवण्याचे या अगोदरच जाहीर केल्यामुळे आज वैभववाडीचा आठवडे बाजार असून भाजीपाला सह सर्वच फिरते व्यापारी बाजार पेठेत आले आहेत.
भाजी, फळांची दुकानांन समोर ग्राहकांची मोठी गर्दी दिसत होती. तर किराणा माल, सजावटीची दुकाने, इलेक्ट्रिक सामानाचे दुकाने ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. गावागावात गणेश भक्तांमध्ये नवंचैतन्य आले असून सगळीकडे गणपती बापाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. वर्षभर बंद असलेली घरे खुल्ली झाली आहेत. घरासमोर विद्युत रोषणाई, रंगरागोटी, घरातून गणपती बापाच्या आरती भजनाचे स्वर येऊ लागले आहेत. त्यामुळे सगळीकडे भक्तिमय, आनंदी वातावरण झाले आहे. मंगळवारी सकाळपासून काही गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला वाजतगाजत घराकडे घेऊन जाताना दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर भक्तीची व आनंदी भावना दिसत होती.











