आले हो गणपती बाप्पा आले…!

सिंधुदुर्गात ७७२७० घरगुती गणपतींचे स्वागत; जिल्हाभर उत्साहाचे वातावरण

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. जिल्हाभरात तब्बल ७७२७० घरगुती गणपतींचे आगमन झाले असून सार्वजनिक गणेश मंडळांतही श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा विधीपूर्वक संपन्न झाली आहे. गावागावांत भक्तिगीतांचा गजर, आरत्यांचा निनाद आणि मंत्रमुग्ध वातावरणामुळे उत्सवाचे वेध सर्वत्र जाणवत आहेत. जिल्ह्यात गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा न राहता सर्व धर्मीय मोठ्या उत्साहाने यात सहभागी होतात त्यामुळे तो एक सामाजिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक एकात्मतेचा सोहळा बनला आहे.

मुंबई, पुणे आदी ठिकाणांहून चाकरमान्यांचा मोठ्या प्रमाणावर ओघ सुरू आहे. गावी परतलेल्या चाकरमान्यांमुळे घराघरांत सणाचा आनंद द्विगुणित झाला आहे. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन एसटी विभागाने जादा बसगाड्या सोडल्या असून प्रमुख मार्गांवर वाहतूक व्यवस्थेसाठी पोलीस प्रशासनाने विशेष बंदोबस्त ठेवला आहे. जिल्ह्याच्या प्रमुख बाजारपेठा सजून गेल्या असून ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. गणेशमूर्ती, सजावटीचे साहित्य, फुलं, मिठाई, तसेच विविध पूजासाहित्य खरेदीसाठी नागरिकांची लगबग वाढली आहे.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने सार्वजनिक गणेश मंडळांत भजन, सांस्कृतिक स्पर्धा, बालगोपाळांसाठी विविध उपक्रम, तसेच सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. यंदा शाडूच्या मूर्त्यांसोबत पीओपी च्या गणेश मूर्त्यांचेही आगमन मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक उपक्रमांना तसेच देखाव्यांना प्रोत्साहन दिल्याचे पाहायला मिळत आहे. सणासुदीच्या काळात कुठे गालबोट लागू नये म्हणून जिल्हा प्रशासनही सतर्क झाले आहे. सर्वत्र आनंद, उत्साह आणि भक्तिभावाचे वातावरण पसरले असून ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात वातावरण मंत्रमुग्ध झाले आहे.

error: Content is protected !!