खारेपाटण ग्रामस्थांनी प्रा.आ. केंद्रातील सोयी-सुविधांविषयी प्रशासनाला विचारला जाब

रुग्णालयात पूर्णवेळ एम. बी. बी. एस. डॉक्टर देण्यात यावा – ग्रामस्थांची मागणी

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण प्रा.आ. केंद्रात असलेला अपुरा कर्मचारी वर्ग तसेच १०८ ॲम्ब्युलन्स उपलब्धतेबाबत आणि येथे पूर्ण वेळ एम. बी. बी. एस. डॉक्टर नसल्यामुळे ग्रामस्थांच्या होणाऱ्या गैरसोयी व समस्यांबाबत आज खारेपाटण ग्रामस्थांच्या वतीने प्रा.आ. केंद्राशी संबंधित प्रशासनाला घेराव घालून जाब विचारण्यात आला. खारेपाटण ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण ग्रामसभेत आरोग्य सेवांविषयी ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केल्यामुळे खारेपाटण प्रा.आ. केंद्र येथे ग्रामस्थांनी जाण्याचे ठरविले होते. त्यानुसार मंगळवार दि.९ सप्टेंबर, २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता खारेपाटण प्रा.आ. केंद्र येथे जाऊन येथे उपस्थित असलेल्या कणकवली तालुका आरोग्य अधिकारी श्रीम. डॉ. इंगवले व खारेपाटण प्रा.आ.केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम यांना खारेपाटण ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडिमार करत जाब विचारला. ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत खारेपाटण गावासाठी पूर्णवेळ एम. बी. बी. एस. डॉक्टर लवकरच उपलब्ध करून देण्याबरोबरच येथे १०८ ॲम्ब्युलन्स देखील तातडीने उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन यावेळी तालुका आरोग्य अधिकारी श्रीम.डॉ.इंगवले यांनी ग्रामस्थांना दिले.

खारेपाटण प्रा.आ.केंद्र हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेले व मुंबई – गोवा राष्ट्रीय महार्गावरील अतिशय महत्त्वाचे असे रुग्णालय असून येथे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यासह वैभववाडी, देवगड तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी येत असतात. राष्ट्रीय महामार्ग नजीक असल्याने येथे सातत्याने अपघातग्रस्त रुग्ण रात्रंदिवस येत असतात. त्यामुळे येथे १०८ ॲम्ब्युलन्स वेळेत उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्ण व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर एवढी मोठी पी. एच. सी. असूनदेखील येथे पूर्णवेळ एम. बी. बी. एस. डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे मृत पेशंटचे निदान करणे किंवा शव विच्छेदन प्रकिया पार पाडणे आणि प्रशासकीय कागदपत्रावर सही करण्यासाठी दुसऱ्या प्रा.आ.केंद्राच्या एम. बी. बी. एस. डॉक्टरवर अवलंबून रहावे लागते. तर एकेकाळी याच प्रा. आ. केंद्रात दिवसा १०० च्या वर असणारी ओपीडी आज अपुरा असलेला कर्मचारी वर्ग, रुग्णांना होणाऱ्या गैरसोयी मुळे कमी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे या सर्व बाबीचा विचार करता ग्रामस्थांच्या वतीने आज खारेपाटण प्रा.आ. केंद्राच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारण्यात आला.

यावेळी खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांनी गावच्या वतीने आरोग्याशी संबंधित मागण्यांचे लेखी निवेदन उपस्थित अधिकाऱ्यांकडे दिले. यावेळी उपसरपंच महेंद्र गुरव, माजी सरपंच रमाकांत राऊत, सामाजिक कार्यकर्ते मंगेश गुरव, महेश कोळसुलकर, नंदकिशोर कोरगावकर, सुधीर कुबल, विजय देसाई, मंगेश ब्रम्हदंडे, सुरेश गुरव, बबन तेली, प्रकाश कांबळी, ग्रा.पं. सदस्य जयदीप देसाई, किरण कर्ले, अस्ताली पवार, क्षितिजा धुमाळे, दक्षता सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!